भूगोल हा विषय चार भिंतीआड न शिकून प्रत्यक्ष अनुभवा!

0

शिरपूर । श्रीमती एच.आर.पटेल कला महिला महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने भूगोल सप्ताह साजरा करण्यात आला. भूगोल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शारदा शितोळे होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. जे.व्ही.पाटील यांनी विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा व भूगोल विषयाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. भूगोल हा विषय चार भिंतीआड शिकायचा नसून तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे

विद्यार्थिनींनी पर्यटन क्षेत्रासह निसर्ग, संस्कृतीचा प्रत्यक्ष परिचय करून घेतला पाहिजे. मकरसंक्रांत व भूगोल दिवस यांचा सहसंबंध अत्यंत जवळचा आहे. कारण 14 जानेवारीनंतर उत्तर गोलार्धात उष्णता हळू हळू वाढते. त्यामुळे ऊर्जा मिळते. भूगोल दिवस हा डॉ. सी.डी.देशपांडे यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो.

यांची होती उपस्थिती
प्राचार्य डॉ. शारदा शितोळे म्हणाल्या की, भूगोल विषयाच्या विद्यार्थिनींनी नवनवीन ज्ञान शाखांचे अध्ययन केले पाहिजे. त्यातून भोगोलिक स्थान, विस्तार तसेच देश विदेशातील संस्कृतीचा अभ्यास, हवामान व मानवीय हालचाली या संबधीचे ज्ञान भूगोल विषयातून मिळत असतो. कार्यक्रमाचे संयोजन भूगोल विभागाच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन पूजा दिलीप पाटील तर प्रास्ताविक प्रा. डॉ. आर.एम.वाडिले यांनी केले. कार्यक्रमास प्रा. एल.झेड.पाटील व भूगोल विषयाच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.