भूजलाच्या तंत्रशुद्ध आराखड्याची गरज

0

भूजलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे यांचे मत : ‘भूजलाशी मैत्री’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा

पुणे : शासनाकडे जलआराखडा बनविण्याची पद्धत परिपूर्ण नाही. यातील भूजल या घटकांकडे अतिशय दुर्लक्षित आहे. भूजलाची आकडेवारी व तंत्रशुद्ध मार्गदर्शनाअभावी जलसंधारण योजनांत येणार्‍या अपयशावर मात करण्यासाठी भूजलाचा तंत्रशुद्ध आराखडा कसा बनवावा यावर कार्यक्षम तज्ज्ञ अभ्यासकांचा अहवाल असण्याची गरज असल्याचे मत भूजलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे यांनी व्यक्त केले. शासन, अभ्यासक व नागरिक यांच्यात समन्वय झाला पाहिजे. तरच खर्‍या अर्थाने जलसाक्षर समाज घडेल, असेही त्यांनी आग्रहाने नमूद केले.

समग्र नदी परिवार यांच्यावतीने ‘भूजलाशी मैत्री’ या विषयावर गुरुवारी (दि.10) एरंडवणे येथील मनोहर मंगल कार्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी धोंडे ‘सहज जलबोधाने परिपूर्ण जलआराखडा’ बनविण्याच्या महत्त्वाविषयी बोलत होते. यावेळी डॉ. प्रदीप पुरंदरे, डॉ. उमेश मुंडल्ये, सतीश देशमुख, जगदीश गांधी, मिलिंद बागल, राजेंद्र शेलार, मयूर बागूल, प्रशांत शिनगारे, प्रतिभा शिंदे, कल्पना सांळुके उपस्थित होते.

साडेतीनशे फुटाखालचे पाणी आपल्या हक्काचे नाही

धोंडे म्हणाले, भूगर्भातील पाण्याची संशोधकांनी तपासणी केली. त्यामध्ये पाचशे फूट खोलीवर आढळलेल्या भूजलाचे वय हजारो वर्षापूर्वीचे असल्याचा अहवाल समोर दिसून आला. साडेतीनशे फुटाखालचे पाणी हे आपल्या हक्काचे नाही. ते निसर्गाचे पाणी आहे, ते जर पाणी उपसले तर भूकंपासारख्या नैसर्गिक हानीकारक असलेले प्रकार घडू शकतील. त्यासाठी आपण कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाही.

1972नंतर बोअरवेलमध्ये वाढ

भूजलाचे महत्व बघता जलआराखड्याला भूजल आराखडा असे म्हणता येईल. भूजलाचा अतिरिक्त उपसा म्हणजे की उपसा याचे मोजमाप नाही. प्रशासनात 1972नंतर विहिरींच्या व बोअरवेलच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे पाण्याचा प्रचंड उपसा होत आहे. हे लोकांना सांगणार कोण असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दिवसेदिवसे पाणीपातळी कमी होत आहे. आज नऊशे फूटापासून पाणी उपसले जात आहे, ही गंभीर बाब आहे.

भूजलाचे खासगीकरण ही नवीन समस्या तयार

समन्यायी पाणी वाटपाचा जो कायदा अस्तित्वात आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होतच नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप कसे होईल. उलट पाण्यासाठी भांडणे सुरू होतील. भूजलसाठा नेमका किती आहेत, याची अद्यावत माहिती कोणाकडेही नाही. शेती करताना पाण्यासाठी शेततळ्याची संकल्पना पुढे आली. परंतु तिची अंमलबजावणी करताना अत्यंत ढिसाळपणे झाली. त्याउलट भूजलाचे खासगीकरण अशी नवीन समस्या तयार झाली. गावागावात शेततळे भरण्यासाठी भूजलाचा प्रचंड उपसा सुरू आहे.

शेततळे भूजलासाठी घातक

पुढील दोन ते तीन वर्षानंतर आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर पाणीपातळी खाली गेल्याचे दिसून येईल. शेततळे ही शेतकर्‍यांना फायदेशीर ठरत असली तरी भूजल पातळीच्यादृष्टीने तितकीच घातक ठरत आहे. आज शेततळे उभारणी करताना मार्गदर्शन सुचना आहेत. त्यानुसार शेततळे तयार केली पाहिजे. आज जी शेततळे घेतली जात आहे, ती शास्त्रीय पद्धतीने घेतली जात आहे. समग्र नदी परिवाराचे अध्यक्ष सुनील जोशी यांनी प्रास्तविक केले. मयुर बागल यांनी आभार मानले.