भूजल पातळी वाढवण्यासाठी धनाजी नाना महाविद्यालयाचा पुढाकार

0

रेन वॉटर हार्वेस्टिंगचा 5000 विद्यार्थ्यांमार्फत ग्रामीण भागात पोहचणार संदेश

फैजपूर- मागील वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे यंदाच्या उन्हाळ्यात भुगर्भातील पाण्याची पातळी कमालीची खालावली होती. भुगर्भातील भुजल पातळी वाढवण्यासाठी गरजेची असल्याने धनाजी नाना महाविद्यालयाने पुढाकार घेवून आपल्या परीसरात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या संकल्पनेतून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली. महाविद्यालयाने ही जबाबदारी समाजहीत जोपासण्यासाठी स्विकारलेली आहे.

समाजहित जपण्यासाठी महाविद्यालयाने घेतली जवाबदारी
तापी परीसर विद्यामंडळाने पुढाकार घेवून 38 एकरच्या पूर्ण परीसरात व प्रयोगशाळा इमारत, वर्गखोली इमारत, महाविद्यालायचे क्रीडांगण आणि मोकळ्या जागेतील पाणी या करीता वेगवेगळ्या ठिकाणी खोल खड्डे केले आहेत तसेच क्रीडांगणाच्या 40 बाय 40 च्या स्वरुपात शेततळ्यासाठी खड्डा तयार केला आहे. त्यामध्ये परीसरातील पाणी जमा होवून भुगर्भात झिरपून परीसरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. महाविद्यालयाने ही जबाबदारी समाजहित जपण्यासाठी स्विकारून शैक्षणिक संस्थेत हा उपक्रम राबवला सुरू केला आहे. आपल्या भविष्यातील येणार्‍या भावी पिढीकरीता पाणी अडवा-पाणी जिरवा, असा संदेश महाविद्यालयाने दिला आहे.

ठोस उपाय योजनांची आवश्यकता
अत्यल्प प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे दिवसेंदिवस भुगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे. इतकेच नव्हे तर शेत-शिवारासाठी भुगर्भातील पाण्याचा अमर्याद उपसा होत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना पाणीटंचाई चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे भुजल पातळी वाढीसाठी नद्या, नाले यांचे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी सर्वांनी ठोस उपाय योजनांसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संदेश
ग्रामीण भागातील पाच विद्यार्थी विविध शाखेतून महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.त्यामुळे पाणी अडवा-पाणी जिरवा हा संदेश सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार असून त्याची इतर भागातही मदत होणार असल्याचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी सांगितले.

विविध औषधी वनस्पतीची लागवड
परीसर हिरवागार रहावा यासाठी महाविद्यालय जैव विविधता जपत आहे. महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्राचे उद्यानात विविध औषधी वनस्पतींची लागवड सुद्धा करण्यात आलेली आहे .तर महाविद्यालयातील रेन वॉटर हार्वेस्टिंग कामाची पाहणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांच्या समवेत महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.उदय जगताप, उपप्राचार्य डॉ.अनिल भंगाळे, प्रा.डी.बी.तायडे, प्रा.अनिल सरोदे, डॉ.एस.व्ही.जाधव, प्रा.विलास बोरोले, प्रा.आर.पी.झोपे यांनी केली.