पुणे : कुटुंबीयांना भुताने झपाटल्याचे सांगून भूत उतरवण्याच्या नावाखाली सासू-सुनेवर नैसर्गिक, अनैसर्गिक पद्धतीने बलात्कार करणार्या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली. या भोंदूने फिर्यादी कुटुंबीयांकडून आठ लाखांची रोख रक्कम, चार महागड्या कार आणि सातारा येथील एक प्लॉट बळकविला असल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली. हैदरअली रशीद शेख (वय 47, रा. कसबा हाईट्स, गुरूवार पेठ, सातारा) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सात दिवसांची पोलिस कोठडी
भोंदूबाबावर महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध अधिनियम 2017 च्या कलम 3 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2012 तसेच पॉक्सो अधिनियम 2012 नुसार खडक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने या भोंदूबाबाला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी महिला आणि तिचे कुटुंब मुळचे सातार्याचे आहेत. पीडित महिलेचा पती इंजिनिअर असून, पुण्यातील मुकुंदनगर या परिसरात त्यांचे कार्यालय आहे. मागील काही वर्षापासून ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. सध्या ते कोंढव्यातील मोमीनपुरा येते वास्तव्यास आहेत. आरोपी शेख हा सातार्याचा असल्यामुळे फिर्यादीच्या कुटुंबीयांशी ते परिचित होते. शेख हा सातारा परिसरात हाप्पीज म्हणून प्रसिध्द आहे. दैवीशक्तीने तो आजार, बाधा दूर करण्याचे काम आपण करतो अशी बतावणी तो त्या परिसरात करत होता.
कुटुंबीय पूर्णपणे भोंदूबाबाच्या आहारी
10 वर्षांपूर्वी फिर्यादी महिलेला उलट्या आणि चक्कर येत असल्यामुळे ती कुटुंबीयांसह शेख यांच्याकडे उपचारासाठी गेली होती. तेव्हा आजार बरा झाल्यामुळे त्यांचा शेख याच्यावर विश्वास बसला. त्यांनतर हे कुटुंबीय पूर्णपणे शेख यांच्या आहारी गेले. शेखला विचारल्याशिवाय कोणतेच काम ते करत नव्हते. नवीन वस्तू खरेदी करण्यासारख्या अगदी किरकोळ बाबी संदर्भातही ते शेख याचा सल्ला घेत होते. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.
उपचाराच्या बहाण्याने वेळोवेळी बलात्कार
पीडित महिला सतत आजारी पडत होती. आणि हे आजारपण भूतबाधेमुळे झाल्याचे आरोपी शेख याने तिच्या कुटुंबीयांना सांगितले. भूतबाधा उतरविण्यासाठी महिलेवर उपचार करण्याच्या बहाण्याने हैदरअली घरी येऊ लागला. त्यावेळी उपचार करण्याच्या बहाण्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर याबाबत पतीला किंवा कोणाला सांगितले तर तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि मी सर्व चित्रीकरण केले आहे. त्यामुळे बदनामी करीन असे पीडित महिलेला धमकावले. याचाच फायदा घेत शेख याने वेळोवेळी त्यांच्याकडून आठ लाख रुपये, टाटा सुमो, तवेरा, स्कोडा आणि एक सॅन्ट्रो कार, एक बुलेट आणि करिझ्मा मोटारसायकलही घेतली. पीडित महिलेच्या उपचारासाठी तिला बाहेर घेऊन जावे लागेल असे तिच्या पतीला सांगितले आणि तिला वेळोवेळी महाबळेश्वर, रत्नागिरी, सातारा येथे नेऊन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचारही केले. त्यासोबतच 2006 साली महिलेच्या सासूवरही उपचाराच्या बहाण्याने भोंदूने लैंगिक अत्याचार केले. याबाबत महिलेने पतीला सांगितले. मात्र त्याच्यावर असलेल्या विश्वासामुळे कोणीही त्याच्या विरोधात तक्रार केली नव्हती, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले.
मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न
एवढे करुनही शेख याची वाईट नजर पीडीत महिलेच्या चौदा वर्षाच्या मुलीवर पडली. एके दिवशी महिला व तिची सासू घरी असताना तिच्या चौदा वर्षीय मुलीशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या या मुलीने आई आणि कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यांना धक्काच बसला. त्यानंतर महिलेने मुलीला त्याच्यासमोर यायचे नाही, असे सांगितले. त्यामुळे हा प्रकार समोर आला. महिलेने त्याच्याविरोधात थेट खडक पोलिसात धाव घेतली. सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर खडक पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास खडकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी करत आहेत.