भूमकर चौकातील वाहतुकीची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

0

पिंपरी : वाकड मधील भूमकर चौकात वाहतूक व्यवस्थेत आज (सोमवार) पासून बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीत बदल केल्यानंतर वाहतूक सुरळीत आहे का, नागरिकांना प्रत्यक्ष काय अडचणी येतात, याबाबत पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी स्वतः भूमकर चौकात उपस्थित राहून पाहणी केली. तसेच वाहन चालकांशी संवाद साधला.

भूमकर चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. हिंजवडी वाहतूक विभागात वाहतूक कोंडीच्या बाबतीत हिंजवडी मधील शिवाजी चौकानंतर भूमकर चौकाचा नंबर लागतो. पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून हिंजवडीला वाहतूक कोंडीमधून मुक्त करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. शिवाजी चौकातील वाहतूक बदलानंतर पोलीस आयुक्तालयाकडून भूमकर चौकामधील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल देखील प्रायोगिक तत्वावर करण्यात आले असून पुढील दहा दिवसांत नागरिकांना याबाबत सूचना आणि हरकती पोलीस आयुक्तालयाकडे लेखी स्वरूपात जमा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या सूचना आणि हरकती लक्षात घेऊन अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.