शिंदखेडा । येथील लक्ष्मी नारायण मंदिराजवळ भूमिगत गटार तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र गेल्या चार पाच महिन्यांपासून हे काम अपुर्ण अवस्थेत असल्याने त्याठिकाणी तयार झालेला खड्डा मृत्यूचा सापळा बनला आहे. कॉलनी वासियांनी ही बाब नगर पंचायतीच्या निदर्शनास आणून दिली आहे . मात्र हे काम पूर्ण करणेसाठी अद्यापही नगरपंचायतीने कोणतीही पाऊले उचलली नाही. गटारीचे काम तात्काळ करून खड्डा बुजविण्यात यावा अशी मागणी कॉलनीवासियांनी केली आहे.
विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल
शहरातील विरदेल रोड परिसरात असलेल्या मंदिराजवळ जवळपास सहा महिन्यांपूर्वी येथील नगरपंचायतीतर्फे भूमिगत गटार तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र नविन तयार केलेली गटार पूर्वीच्या जून्या असलेल्या गटारीला जोडता येत नसल्याने ते काम अपूर्ण अवस्थेत आहे. या भागात जनता हायस्कूल मधील विद्यार्थी लक्ष्मी नारायण कॉलनीतील व इतरनागरिकांचा व वाहनधारकांचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. सदर खड्डा हा कॉर्नरवरच असल्याने अधिकच धोकादायक बनला आहे.
वाहनचलविणे बनले अवघड
शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या काळात परिसरातील नागरिकांनी याबाबत नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांचेकडे साकडे घातले होते.नगरपंचायतीची निवडणूक होवून दोन महिने झालेत त्यानंतर देखील नगरपंचायतीने या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. खड्ड्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. खड्डा खोदून बाहेर काढलेली माती देखील रस्त्यावर पसरल्याने वाहन चालविणे अवघड झाले आहे.