भूमिगत वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित

0

पिंपरी-पुणे व पिंपरी शहरात दोन ठिकाणी सुरु असलेल्या खोदकामामध्ये महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वाहिन्या तोडल्याने आज बुधवारी सुमारे 8 हजार 700 वीजग्राहकांची खंडित वीजपुरवठ्यामुळे गैरसोय झाली.

पुणे महानगरपालिकेकडून लुल्लानगर येथे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या कामासाठी कंत्राटदाराकडून जेसीबीने खोदकाम सुरु असताना सकाळी साडेकराच्या सुमारास कोंढवा 22 केव्ही वीजवाहिनी तुटली व 20 रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. यातील 8 रोहित्रांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र लुल्लानगर ते एनआयबीएम रोडवरील 12 रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित राहिला. त्यामुळे सुमारे 1200 वीजग्राहकांची गैरसोय झाली. सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर या वाहिनीवरील वीजपुरवठा पूर्ववत होणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या प्राधिकरण भागात महानगरपालिकेकडून पाईपलाईनचे काम सुरु आहे. या कामाच्या खोदकामात प्राधिकरण स्विचिंग स्टेशनला वीजपुरवठा करणारी इनकमर भूमिगत वाहिनी तुटली. त्यामुळे या स्विचिंग स्टेशनमधील आऊटगोईंग तीन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणकडून यातील दोन वाहिन्यांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला. परंतु विकासनगर व देहूरोड परिसरातील सुमारे 7500 वीजग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या एका वाहिनीवरील वीजपुरवठा दुपारी 3 तास खंडित होता.