भूमिगत वीजवाहिनी, 15 ट्रान्सफार्मर, 2 सबस्टेशनसाठी प्रस्ताव मागितले

0

आमदार संजय सावकारेंनी घेतली महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक

भुसावळ:- शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरील भूमिगत वीज वाहिनीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील तब्बल सात किलोमीटर अंतराच्या भूमिगत वीज वाहिनीसह अन्य कामांसाठी आमदार संजय सावकारे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत सोमवारी आढावा बैठक घेतली. या कामाचा प्रस्ताव मागवून त्यास गती दिली जाईल. यासह शहरासाठी नवीन 15 ट्रान्सफार्मर आणि दोन नवीन सबस्टेशनसाठीही महावितरणकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

पाठपुराव्यानंतर मिळणार कामांना गती
महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत आमदार संजय सावकारे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग असलेल्या नृसिंह मंदिर, डिस्को टॉवर, अप्सरा चौक, मरीमाता मंदिर, सराफ बाजार ते स्टेशनरोड या मार्गावर वीजतारांचे जंजाळ आहे. या रस्त्यावर भूमिगत वाहिनीसाठी महावितरणने आरएपीडीआरपी योजनेतून भूमिगत वीज वाहिनीची योजना मंजूर केली होती मात्र यावेळी हे काम पूर्ण झाले नाही. यामुळे आता महावितरणने या कामाचा प्रस्ताव करून तातडीने द्यावा यासह शहरासाठी नवीन 15 ट्रान्सफार्मर व दोन स्वतंत्र 33 बाय 11 केव्ही उपकेंद्राचा प्रस्ताव सादर करावा तसेच भुसावळ विभागात विजेचे वितरण सुरळीत होण्यासाठी भादली व एमआयडीसी येथे नवीन सबस्टेशन निर्माण करण्याबाबत चर्चा केली. भुसावळ तालुक्यात एमआयडीसीत सद्यस्थितीत असलेल्या खेडी केंद्रासोबतच नवीन 132 केव्ही क्षमतेचे सबस्टेशन झाल्यास उद्योगवाढीस अधिकगती मिळणार आहे. महावितरणसह पारेषण व महानिर्मितीच्या अधिकार्‍यांनी हा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याबाबत पाठपुरावा करून आगामी काळात या कामांना गती दिली जाणार आहे. या विकासात्मक कामांमुळे शहरात अनेक कामे गतीने होणार आहेत. सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे.

शहर होणार केबलमुक्त
उघडया वीज वाहिनींमुळे शहरात वीजगळतीचे प्रमाण वाढून अपघाताचाही धोका कायम राहतो. यामुळे सात किलोमिटरची भूमिगत आणि तीन किलोमीटर अंतराची ओव्हरलूप केबल टाकण्यात यावी, असा निष्कर्ष या बैठकीतून काढण्यात आला. या कामाच्या पुर्ततेनंतर भुसावळ शहर केबलमुक्त होणार आहे. त्यासाठी सर्व्हेक्षणाच्या कामास मंजुरी मिळाली असून यासाठी निधी उपलब्ध आहे.

ट्रान्समिशन सेंटरचे स्थलांतरण
महापारेषण कंपनीचे एक ट्रान्समिशनचे सबस्टेशन हे दीपनगर औष्णिक उर्जा निर्मिती केंद्रात आहे. या केंद्रात अनेक बदल होत आहेत. त्यामुळे ऑपरेशनरूम आणि कंट्रोलरुम स्थलांतरीत होणार आहे. आरपीडी भागात हे स्थलांतरण करण्यासाठीच्या हालचाली आहेत. यामुळे शहरातील विजेची समस्या मोठ्या प्रमाणात निकाली निघण्याचे सकारात्मक चिन्हे आहेत. शहरात लवकरच या कामांना सुरवात होणार असल्याचीही चर्चा या बैठकीत करण्यात आली.