भूमिगत वीजवाहिन्यांची केवळ 40 टक्के कामे

0

पुणे । शहर आणि उपनगरातील वीजवाहिन्या शंभर टक्के भूमिगत करण्याचे आश्‍वासन देणार्‍या महावितरणने आतापर्यंत हे काम फक्त 35 ते 40 टक्के केल्याची माहिती समोर आली आहे. विशेषत: झोपडपट्टी परिसरात हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.पुणे शहर आणि ग्रामीण भागातील वीजवाहिन्या शंभर टक्के भूमीगत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पहिल्या टप्पात शहरी भागात होणार्‍या या कामासाठी महावितरणने निधी मंजूर केला होता. दोन ते अडीच वर्षांत ही कामे पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला होता. त्यानुसार प्रशासनाने पहिल्या टप्प्यात युध्दपातळीवर कामे सुरू केली होती. त्यावेळी शहर आणि काही उपनगरात ही कामे करण्यात आली. त्यानंतर या कामांची गती अक्षरश: मंदावत गेली. या कालावधीत शहर आणि उपनगरात अवघ्या 30 ते 40 टक्के वीजवाहिन्या भूमिगत करण्यास महावितरणला यश आले. परंतु त्यानंतर ही कामे पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे अजूनही 60 ते 65 टक्के भागातील वीजवाहिन्या लटकलेल्या अवस्थेत आहेत.

मध्यवस्ती, झोपडपट्टयांना धोका
महावितरणने वीजवाहिन्या भूमीगत करताना झोपडपट्टी आणि शहराच्या मध्यवस्तीच्या भागाला सर्वाधिक प्राधान्य देण्याची गरज होती. या भागात वीजवाहिन्यांमुळे अपघाताचा धोका सर्वाधिक आहे. बहुतांशी पेठांमध्ये अजूनही वीजवाहिन्या भूमीगत नाहीत. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महावितरण यांच्यामध्ये रस्ते खोदाई दरांबाबत वाद सुरू होता. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यावर उभयमान्य तोडगा काढण्यास यश आले आहे. त्यामुळे हे काम युध्दपातळीवर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रशासनाकडे अपेक्षित निधीही प्राप्त झाला आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
– मल्लेशा शिंदे
मुख्य अभियंता, महावितरण, पुणे परिमंडल