जळगाव । महापालिकेतील वादग्रस्त भूसंपादन प्रकरण दाबण्यासाठी भाजपाच्या एका स्वीकृत नगरसेवकाला साडेतीन कोटी रुपयांची
ऑफर मिळाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी अनौपचारिकपणे ‘जनशक्ति’शी बोलताना दिली. या प्रकरणात महापालिका 12 कोटी रुपये देणे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून भूसंपादन प्रकरणांमध्ये लॅण्ड माफिया कार्यरत असल्याचा आरोप होत आहे.
महापालिकेने भूसंपादन केलेल्या प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होण्यापूर्वीच महासभेत भाजपा नगरसेवकांनी त्याचा पर्दाफाश केला होता. एका प्रकरणात संबंधित जागा मालकाला केवळ 76 हजार रुपये देणे असताना पुन्हा भूसंपादनाची प्रक्रिया राबवून 12 कोटी लाटण्याचा काही जणांचा संघटित कट यामुळे उधळला गेला. मात्र, यापुढे हे प्रकरण उचलू नये म्हणून भाजपाच्या एका स्वीकृत नगरसेवकाला 3 कोटी 60 लाख रुपयांची ऑफर मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत संबंधित नगरसेवकाशी संपर्क साधला असता, त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. भाजपाच्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, महेश चौधरी व राजेंद्र मराठे यांचा समावेश आहे. हे प्रकरण जळगाव शहरातील बड्या व्यक्तींशी संबंधित आहे.
चौकशीसाठी समिती गठित
भूसंपादन प्रक्रियेत दोषी असलेले अधिकारी, कर्मचारी व विधीज्ज्ञ यांच्या विरोधात फौजदारी कारवाईसाठी सत्ताधार्यांनी समिती गठीत केली आहे. यात नगरसेवक अॅड. शुचिता हाडा, अॅड. दिलीप पोकळे, कैलास सोनवणे, नितीन लढ्ढा यांचा समावेश आहे. या प्रकरणी न्यायालयात पालिकेची बाजू मांडण्यासाठी पुनर्विलोकन याचिका दाखल करणे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ नेमण्याचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत.