पुणे । प्रस्तावित बारामती-फलटण या लोहमार्गासाठी कोणत्याही प्रकारचे भूसंपादन झालेले नसताना बारामतीचे प्रांताधिकारी हे संपादन झालेले आहे, असे खोटे सांगून शेतकर्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. जबरदस्तीने जमीन संपादन केल्यास शेतकर्यांकडून सामूहिक आत्महत्या करण्यात येणार असल्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
बारामती- फलटण लोहमार्गावर बारामती तालुक्याच्या हद्दीतून 37 कि.मी. लोहमार्गाचे जाळे पसरणार आहे. हा मार्ग लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगळवाडी, बर्हाणपूर, नेपतवळण, सोनकसवाडी, ढाकाळे, थोपटेवाडी, सावंतवाडी, तांदूळवाडी, कटफळ गावातून जात आहे. आतापर्यंत आठ गावांतील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा दावा शासकीय अधिकार्यांनी केला आहे.
स्थानिक शेतकर्यांचा विरोध
स्थानिक शेतकरी संघटना या भूसंपादन आणि मोजणीच्या विरोधात असून, त्यांनी एक इंचही जमीन मोजून दिलेली नाही, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील यांनी केला. काही गावात बाहेरून येऊन खरेदी केलेल्या जमिनी या संपादित केल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
शासनाला पाठविलेला प्रस्ताव चूकीचा
लाटे आणि माळवाडी येथील संपादन केलेल्या जमिनीचा दरनिश्चिती प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच सर्व गावांतील भूसंपादनाची प्रकिया ही 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे भूसंपादन झाले नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, 37 किलोमीटर अंतर असलेल्या या लोहमार्गामुळे 13 गावांतील सुमारे 200 हेक्टर जमिनीवर भूसंपादन होणार आहे. भूसंपादन झाल्यानंतरच किती शेतकर्यांच्या किती हेक्टर जमिनी गेल्या ते कळू शकणार आहे. मोबदल्याबाबत शेतकर्यांनी निश्चिंत राहावे, असेही शासनाकडून कळविण्यात आले आहे.