भेकराईनगर रस्त्याची एका पावसातच झाली चाळण!

0

वाहतुकीची कोंडी; प्रशासन झोपले आहे काय? संतप्त नागरिकांचा सवाल

हडपसर – सासवड रस्त्यावर रविवारी झालेल्या एका पावसाने भेकराईनगर ते मंतरवाडी चौकापर्यंत अर्धा ते एक फुट खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी खड्डे होते, त्याच ठिकाणी परत खड्डे पडले आहे. यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसल्याने संतप्त नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे-सासवड महामार्गावर भेकराईनगर येथील हे खड्डे इतके मोठे आहे की बस, ट्रकचे चाक यात अडकून ते पलटी होऊ शकतात. खड्ड्यांमुळे बस एका बाजूला झुकली आहे. या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी या रस्त्यावर होत आहे. हे प्रशासन एवढे सुस्त झाले आहे की नागरिकांच्या जीवाची त्यांना काही घेण देणे राहिलेले नाही. या खड्ड्यांमुळे 1-2 जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल अशाच पद्धतीने ते काम करीत आहेत. पाऊस थांबल्यावर यांची खड्डे बुजविण्याची पद्धत म्हणजे पुढच्या जोरदार पावसात त्याची डागडुजी करण्याची वेळ येईल. ‘नेमिची’ पडते खड्डे असेच याबाबत म्हणावे लागेल.

सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये भरती झालेले बहुदा सर्व अभियंते एकाच संस्थामधून शिकलेले दिसत आहेत. कारण हे अभियंते खड्डे बुजविण्यासाठी सिमेंट ब्लॉकचा वापर करतात. डांबरा ऐवजी अशापद्धतीने खड्डे बुजविल्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे या खड्ड्यांमुळे कोणाचा जीव गेला तर सार्वजनिक बांधकाममंत्री, ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांना जबाबदार का धरू नये, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. – अनिकेत राठी, सदस्य, परिवर्तन संस्था