कुलभूषण जाधव यांना दीड वर्षांनी पत्नी आणि आई भेटली
इस्लामाबाद : सद्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक असलेले भारताचे नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सोमवारी त्यांच्या आई व पत्नीला भेटता आले. तथापि, पाकिस्तानने या मायलेकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी न देता, दोघांच्यामध्ये काचेचा पडदा लावला होता व केवळ इंटरकॉम टेलिफोनद्वारे संवाद साधू देण्यात आला. पाकड्यांच्या या कृतीबद्दल नंतर भारतासह देशभरात संताप उसळला होता. इस्लामाबाद येथील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कार्यालयात कुलभूषण यांना त्यांच्या आई अवंती जाधव, पत्नी चेतुंकल जाधव यांची कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत भेट घेता आली. यावेळी भारताचे उच्चायुक्त जे. पी. सिंग यांचीही उपस्थिती होती. सुरुवातीला अर्धा तास अशी भेटीची वेळ ठरली होती. परंतु, कुटुंबीयांच्या आग्रहाखातर ती आणखी दहा ते बारा मिनिटे वाढविण्यात आली. जाधव कुटुंबीयांतील चर्चेचा तपशील मात्र मीडियापासून गोपनीय ठेवण्यात आला होता. तब्बल दीड वर्षानंतर ही भेट होत असल्याचे सांगण्यात आले. दुपारी 2 वाजून 18 मिनिटांनी ही भेट सुरु झाली होती, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली. आज पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मदअली जीना यांचा जन्मदिन होता, त्या पार्श्वभूमीवर केवळ मानवतेच्या दृष्टीने ही भेट घडवून आणल्याचेही प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी सांगितले, या भेटीचे छायाचित्रेही त्यांनी मीडियांना उपलब्ध करून दिली.
जवळून बोलता आले नाही, की आईचा स्पर्श नाही!
जिओ वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीचे दुबईमार्गे सोमवारी पाकिस्तानात आगमन झाले. त्या काहीवेळ इस्लामाबाद येथील भारतीय दुतावासात थांबल्या, त्यानंतर कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत त्यांना पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार कार्यालयात नेण्यात आले. प्रारंभिक तपासणीनंतर या दोघींनाही कुलभूषण यांच्या भेटीची परवानगी देण्यात आली. दुपारी 2.18 मिनिटांनी ही भेट सुरु झाली. तथापि, जाधव कुटुंबीयांना एकमेकांशी जवळून बोलता आले नाही किंवा आईला आपल्या मुलाला स्पर्शही करता आला नाही. दोघांच्याही मधात एक काचेचा पडदा लावण्यात आला होता. तसेच, इंटरकॉम टेलिफोनद्वारे संवाद साधावा लागला. यावेळी जाधव कुटुंबीयांसोबत भारताचे उच्चायुक्त जे. पी. सिंग, पाकिस्तानच्या भारतविषयक परराष्ट्र व्यवहार संचालक डॉ. फरिह यांचीदेखील उपस्थिती होती. अर्धा तास भेटीची वेळ असताना जाधव यांच्या आईने आणखी थोडा वेळ मागितला. त्यामुळे पाकिस्तानने आणखी दहा ते 15 मिनिटे वाढवून दिली व निवांत बोलणे होऊ दिले. तथापि, या चर्चेचा तपशील देण्यात आला नाही. बरेच वर्षानंतर मुलाला जवळ घेण्याची आईची इच्छा मात्र पाकिस्तानने पूर्ण होऊ दिली नाही. कारण, दोघांच्या मधात काचेचा पडदा असल्याने आई, मुलगा व पत्नीला एकमेकांचा स्पर्शही करता आला नाही. पाकिस्तानच्या या कृतीबद्दल मात्र संताप व्यक्त होत होता.
पाकप्रवक्ते म्हणतात आम्ही आमचा शब्द पाळला!
मुलासोबत भेट घडवून आणू दिल्याबद्दल कुलभूषण जाधव यांच्या आई अवंती जाधव यांनी पाकिस्तान सरकारचे आभार मानलेत, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते डॉ. फैसल यांनी सांगितले. या भेटीनंतर जाधव कुटुंबीयांना पुन्हा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत भारतीय दुतावासात नेण्यात आले. त्यानंतर सायंकाळच्या विमानाने त्यांनी ओमनमार्गे भारताकडे प्रयाण केले. या भेटीची छायाचित्रेही प्रवक्ते डॉ. फैसल यांनी आपल्या ट्वीटरवर प्रसारमाध्यमांसाठी उपलब्ध करून दिली. आम्ही आमचा शब्द पाळला असून, कमांडर जाधव यांच्या आई व पत्नी या जाधव यांच्याशी निवांतपणे चर्चा करत आहेत, असे ट्वीटही त्यांनी केले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपिता मोहम्मदअली जीना यांच्या जन्मदिनानिमित्त केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून आम्ही ही भेट घडवून आणत आहोत, असे ट्वीटही डॉ. फैसल यांनी केले होते. या बहुचर्चित भेटीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार कार्यालयाकडे जाणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. तसेच, जाधव कुटुंबीयांसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जाधव यांना न्यायिक सहाय्य नाही!
पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, कमांडर जाधव हे भारतीय गुप्तचर संस्था रॉचे एजंट असून, त्यांना देशात घातपाती कारवायांबद्दल 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तानमधून अटक करण्यात आलेली आहे. हेरगिरी व दहशतवादी कारवायांबद्दल पाकिस्तानी लष्कराने जाधव यांना फाशीची शिक्षादेखील ठोठावलेली आहे. तर पाकिस्तानचा हा आरोप भारताने फेटाळून लावला असून, हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यात आलेले आहे. जाधव यांना न्यायिक सहाय्य देऊ देण्यात यावे, अशी मागणी भारताने केली आहे. तथापि, ही मागणी पाकिस्तानने फेटाळून लावली असल्याची माहितीही पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते डॉ. फैसल यांनी सांगितले.