आठवडाभरात 1 कोटींचा माल जप्त; दिवाळीनिमित्त अन्न औषध प्रशासन विभागाकडून मोहीम
पुणे : दिवाळीच्या काळात मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. हे पदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणार्या साहित्यांमध्ये भेसळीचे प्रमाणसुद्धा वाढण्याची शक्यता असते. या भेसळयुक्त पदार्थांमुळे दिवाळीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अन्न औषध प्रशासन विभागाने आत्तापासून छापेसत्र सुरू केले आहे. या कारवायांमध्ये गेल्या आठवडाभरात विविध ठिकाणाहून सुमारे एक कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून विशेष मोहीम
एखाद्या वेळी मिठाई खराब निघाली त्यामुळे काही त्रास झाला तर, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने गेले दहा दिवसांपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. पदार्थ बनविण्यासाठी येणारे साहित्य हे बहुतांशी बाहेर गावाहून येते. त्यामुळे या साहित्यांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्याच आठवड्यात कराड येथे 83 लाखांचे खाद्यतेल पकडण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांत फलटण येथे 17 लाखांचा खवा व मका पकडण्यात आला. आता सोलापूर-नगर या भागातूून येणार्या साहित्यावर लक्ष देण्यात येत आहे.
विशेष पथकांची नेमणूक
दिवाळी आठ दिवसांवर आल्यावर कारवाई करून उपयोग नसतो, त्यामुळे आधीच महिनाभर तयारी करत असतो. त्याप्रमाणे यंदासुद्धा सर्च मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी सोलापूर, सातारा, नगर याभागात विशेष पथके नेमण्यात आली आहेत. रोज सकाळी या पथकांना सूचना केल्या जातात त्याप्रमाणे तपासणी मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेतून गेल्या आठवड्यात कराड आणि फलटण येथे कारवाई केली असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.
पुरवठादारांवर लक्ष केंद्रित
सध्या आम्ही घाऊक बाजारावर लक्ष केले आहे. कारण आत्ता जो काही माल येतो तो घाऊक प्रमाणात येतो. त्यामुळे घाऊक विक्रेते तसेच त्यांना माल पुरविणारे पुरवठादार यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. घाऊक माल येताना त्यात कुठेही भेसळ केलेला माल नाही ना, याची पाहणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर थोडा तरी संशय आला तरी, सर्व माल तातडीने सील करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मिठाई विक्रेत्यांची बैठक
शहरात रिटेल मिठाई विक्रेत्यांकडे माल अगदी शेवटच्या टप्यात येत असतो. त्यामुळे आत्तापासून त्यांच्यावर लक्ष ठेवणे योग्य नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात शहरातील मिठाई विक्रेत्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत विक्रेत्यांना सर्व माहिती देण्यात येणार आहे.त्याचबरोबर भेसळ कशा मध्ये होऊ शकते. भेसळ आढळल्यास काय करायचे त्याचबरोबर भेसळीच्या पदार्थापासून मिठाई बनवू नका असे आढळल्यास काय कारवाई केली जाईल याबाबतसुद्धा माहिती दिली जाणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.