पुणे । कॉलेजमध्ये शिकत असताना भैरप्पांनी वयाच्या 23 व्या वर्षी कादंबरी लेखनाला सुरुवात केली. त्यांनी एकूण 14 कादंबर्या आणि 1 आत्मचरित्र लिहिले आहे. ‘भैरप्पांच्या कादंबर्या 50 वर्षांनंतरही लोकप्रियच आहेत. आजही त्या कर्नाटकात व भारतभर वाचकप्रिय झाल्या आहेत. भैरप्पांना कन्नड लेखक न म्हणता भारतीय लेखक म्हटले पाहिजे. असे मत कन्नड साहित्याच्या अनुवादक लेखिका डॉ. उमा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मसापच्या वतीने आयोजित मासिक मनोरंजनकार का. र. मित्र व्याख्यानमालेचा समारोप करताना त्या बोलत होत्या. ‘भैरप्पांचे कादंबरीविश्व’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, भारतीय समाजाचे चित्रण, जातीभेदावरची भाष्ये, स्त्रीमनाची स्पंदने आणि नैतिक मूल्ये ही भैरप्पांच्या कादंबर्यांची वैशिष्ट्ये आहेत. भैरप्पा आपल्या लेखनाच्या बळावर भारतभर पोहोचलेले लेखक आहेत. भारतीय लोक जी मूल्ये आपल्या डोक्यात ठेवतात त्या मूल्यापर्यंत भैरप्पांची कादंबरी नेते. नैतिकतेच्या काठावर अडकलेल्या कादंबर्या भैरप्पांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या ‘धर्मशील’ या कादंबरीत धर्म बदलल्यामुळे स्वतःची बहीण जन्मभर आपल्या भावाला टाकून देते. धर्माची चौकट मोडून पुढे जाणारी त्यांची ही कादंबरी आहे. त्यांच्या ‘जा ओलांडुनी’ या कादंबरीत जातीय व्यवस्थेचे चित्रण आहे. समाजातील कोणत्याही जातीतल्या माणसाला स्वतःच्या जातीचा अभिमान असतो, असा या कादंबरीचा विषय आहे.
‘आवरण’ समाजातील सामान्य लोकांच्या मनातील विषयाला हात घालणारी कादंबरी आहे. या एका कादंबरीवर दहा पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांच्या एकूण साहित्यावर 25 हून अधिक पुस्तके लिहिली गेली आहेत. बाहेरील देशात कर्नाटकातील लेखकांना बोलावले की त्यांचा जाण्यायेण्याचा सर्व खर्च सरकार करते परंतु भैरप्पांनी कधीही सरकारी खर्चाने प्रवास केला नाही. त्यांच्या कादंबर्या संस्कृत भाषेतही अनुवादित होऊन त्यांच्या 10 आवृत्या निघाल्या आहेत. त्यांच्या सर्व कादंबर्या मिळून एक कादंबरी केली तर ती महाकादंबरी ठरेल. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.