‘भैरवनाथ’वर तक्रारीनुसारच स्थगितीचे आदेश

0

साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांचे स्पष्टीकरण

पुणे : भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड कारखान्यावर करण्यात आलेली कारवाई ही आलेल्या तक्रारीनुसारच करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांनी रक्कम मिळाले नसल्याच्या पावत्यासुद्धा जोडल्या असल्यामुळे परवाना स्थगितीचे आदेश देण्यात आल्याचे साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी सांगितले.

एफआरपीची रक्कम दिली असल्याची आकडेवारी ही प्रत्येक कारखाना साधारण सादर करत असतो. प्रत्येक शेतकर्‍याला किती एफआरपी मिळाली याची माहिती आमच्याकडे नसते, पण तक्रारी आल्यानंतर आम्ही याबाबत माहिती घेतो. त्याप्रमाणे भैरवनाथ कारखान्यांची सुद्धा आकडेवारी तपासली केली जाणार आहे. प्रत्येक शेतकर्‍याचे खाते तपासल्यानंतर तथ्य आढळल्यास कारखान्याला हे पैसे देण्याचे आदेश देण्यात येतील. हे पैसे शेतकर्‍यांना मिळाल्याशिवाय परवाना स्थगिती रद्द होणार नाही, असेही कडू-पाटील यांनी सांगितले.

12 कारखान्यांवर कारवाई

मागच्या वर्षीची एफआरपीची शंभर कोटी रुपयांची रक्कम बारा कारखान्यांची थकीत आहे. ही रक्कम न दिल्यामुळे त्यांचे परवाने दिलेले नाहीत. त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली आहे, असे कडू-पाटील यांनी सांगितले. यापूर्वी 22 कारखान्यांकडे एफआरपीची 450 कोटी रुपयांची रक्कम थकीत होती, पण कारवाई केल्यानंतर त्यातील अनेक कारखान्यांनी शेतकर्‍यांना पैसे दिले आहेत. उर्वरित 12 कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडे शंभर कोटी रुपयांची थकबाकी आहे. या कारखान्यांची मालमत्ता जप्तीचेही आदेश काढले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

एफआरपी थकीत असतानाही खोटी माहिती

काही वेळा काही शेतकरी ऊस लवकर गाळपासाठी आणत असल्याने पहिल्या टप्यात त्यांना जास्त पैसे मिळतात. त्यानंतरच्या टप्यात मात्र शेतकर्‍यांना कमी पैसे मिळाल्याचे प्रकार झाल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे एफआरपी दिलीच नाही, असेही म्हणता येत नाही. याबाबत अधिक तपशील आता प्रत्येक कारखान्याकडून मागवून घेण्यात येणार आहे. शेतकर्‍यांची एफआरपी थकीत असतानाही खोटी माहिती देऊन यंदाचा गाळप हंगाम सुरू केलेल्या राज्यातील साखर कारखान्यांची चौकशी केली जाणार आहे. चौकशीत दोषी आढळणार्‍या कारखान्यांचे गाळप परवाने निलंबित करण्यात येणार आहेत, असेही कडू-पाटील यांनी सांगितले.