भोंगर्‍या सणाला आला अन् ‘ नानल्या उर्फ नांदल्या ‘ एलसीबीच्या जाळ्यात अडकला

0

10 वर्षापासून फरार नानल्या उर्फ नांदल्याला अटक

पत्ते बदलवून वावरायचा फंडा

जळगाव/ चोपडा – जिल्ह्यातील रावेर, यावल व चोपडा ग्रामीण पोलिसात दाखल दोन अशा दरोड्यांच्या गुन्ह्यातील 10 वर्षापासून फरार कुख्यात दरोडेखोर नानल्या उर्फ नांदल्या शंकर बारेला याला स्थानिक गुन्हे शाखेने वैजापूर येथून अटक केली आहे. भोंगर्‍या सणाला आला अन् जाळ्यात सापडल्याची माहिती मिळाली आहे.

चोपडा शिरपूर रस्त्यावर 8 मे 2008 रोजी गलंगी पोलीस चौकीचे पुढे झाडाची फांदी आडवी टाकून ट्रक अडवून त्यावर दगडफेक केली होती. पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक झाल्याने पोलिसांनी गोळीबार केल्यावर आरोपी पसार झाले होते. याचप्रमाणे रावेर बर्‍हापूर रस्त्यावर अशाच प्रकारे दरोडेखोरांनी ट्रकचालक व क्लिनरला मारहाण करुन मोबाईल व रोकड लांबविली होती. यावल पोलीस ठाणे हद्दीतही याचप्रमाणे दरोडा टाकला होता. अशा प्रकारे चार गुन्ह्यात पाहिजे असलेला संशयित नानल्या उर्फ नांदल्या शंकर बारेला 10 वर्षापासून फरार होता.

वैजापूरला येणार असल्याची पक्की खबर
दहा वर्षात ठिकठिकाणचे पत्ते बदलावून वास्तव्य करत असलेला नानल्या पोलिसांच्या हाती लागत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांना नांदल्या भोंगर्‍या सणासाठी वैजापूरला येत असल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर शिंपी, नारायण पाटील, बापू पाटील, योगेश पाटील, बापू पाटील, किरण चौधरी, मनोज दुसाने, सुशील पाटील, प्रविण हिवराळे यांचे पथक तयार केले. पथकाने 14 रोजी वैजापूर गावात सापळा लावला. नानल्याला शिताफीने अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.