रस्त्याचे काम नव्याने करण्याच्या सुचना
पिंपरी चिंचवड : वाल्हेकरवाडी येथील भोंडवे वस्तीतील शिवतीर्थ कॉलनीतील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी निकृष्ट दर्जाचे डांबर वापरले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली असून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाने नागरिकांसोबत अरेरावी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ब प्रभागाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांना घेराव घातला. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत त्यांनी काम बंद करण्याच्या सूचना केल्या. काम बंद झाल्याने संबंधित ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकार्यांनी शिवतीर्थ कॉलनीतील रस्त्याच्या कामाची पाहणी केली. रस्त्याचे काम नव्याने करण्यात यावे, अशा सूचना कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांनी संबंधित ठेकेदारास केल्या.
डांबर हलक्या दर्जाचे…
ठेकेदाराने महापालिकेचे नियम धाब्यावर ठेवून काम सुरू केले आहे. या कामासाठीचे डांबर हलक्या दर्जाचे आहे. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी निकृष्ट कामे करून केली जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. संबंधित अधिकारीही या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे. याबाबत ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाला विचारले असता, मद्याच्या नशेतील पर्यवेक्षकाने, काय करायचं ते करा, असे सांगून बेजबाबदारपणे उडवाउडवीची उत्तरे स्थानिकांना दिली.
“वाल्हेकरवाडी परिसरात विविध ठिकाणी अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. भोंडवे वस्तीतील शिवतीर्थ कॉलनीत डांबरीकरणाचे काम सुरू होते. याबाबत तक्रार आल्यानंतर या कामाची मी पाहणी केली असता, एका ठिकाणी मारण्यात आलेला पॅच निकृष्ट आढळून आला. संबंधित ठेकेदाराला तो पॅच जेसीबीच्या साह्याने काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.” – उमेश मोने, कनिष्ठ अभियंता.