भोंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविली सॅटेलाईट

0

लोणावळा : अ‍ॅड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सॅटेलाईट बनवून त्यांचे ड्रोनच्या साहाय्याने उड्डाणही केले. इस्त्रोचे अध्यक्ष सुरेश नाईक व पुणेकर ग्रुप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कपसॅट मिशन 2018 या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना सॅटेलाईट बनवण्याचे ज्ञान देण्यात आले. दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना डॉ.प्रफुल्ल, राघव, सौरभ या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लिखित व कृतीयुक्त शिक्षण देण्यात आले. भोंडे हायस्कूलचे वीस विद्यार्थ्यी या प्रशिक्षण शिबीरात सामिल झाले होते.

पाच विद्यार्थ्यांचा एक ग्रुप याप्रमाणे चार ग्रुप बनवून चार उपग्रह (सॅटेलाईट) तयार करण्यात आले. नंतर त्यांचे ड्रोनच्या साहाय्याने यशस्वी उड्डाण करण्यात आले. यामध्ये मुलांनी स्वत: उपग्रह बनवून त्यांच्या कडून प्राप्त झालेला डेटा ग्राउंड स्टेशनवर संकलीत केला. अ‍ॅड.बापूसाहेब भोंडे हायस्कूल ही मावळातील पहिलीच शाळा आहे की, जेथे विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारचे उपग्रह बनवून त्यांचे यशस्वी उड्डाण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शास्त्रज्ञ सुरेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तर लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सुहास पुणेकर, अ‍ॅड.माधवराव भोंडे, मुख्याध्यापिका प्रगती साळवेकर उपस्थित होते. तर सचिन पवार हे विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.