अलाहाबाद । देशातील भोंदू बाबांविरोधात आखाडा परिषदेने शनिवारी मोठी घोषणा केली आहे. या परिषदेने देशभरातील 14 बाबांची यादी जाहीर करुन ते भोंदू असल्याचे जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली. या बाबांविरोधात देशव्यापी बहिष्कार घालण्याचे आवाहन परिषदेकडून नागरिकांना करण्यात आले. बाबा राम रहिमवरील बलात्काराच्या गुन्ह्याचा दोषारोप सिद्ध होऊन त्याची रवानगी तुरुंगात झाल्याने हिंदू धर्माच्या धर्मगुरुंची सर्वोच्च संस्था असणार्या अखिल भारतीय आखाडा परिषदेला हे पाऊल उचलावे लागले आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेने हे पाऊल उचलल्याने भोंदू बाबांना आळा बसणार का? अशी चर्चाही सुरू झाली आहे. अशा भोंदू बाबांकडून आजपर्यंत अनेकांची फसवणूक झाली आहे.
संतपदासाठी आता पडताळणी होणार
यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन म्हणाले, काही जणांच्या वाईट कृत्यांमुळे सर्वच धर्मगुरुंकडे संशयाने पाहिले जात असल्याचे सध्या हिंदू संतांना जाणवत आहे. विहिंप आणि अखिल भारतीय आखाडा परिषद हे सोबत काम करतात. संत या उपाधीचा चुकीचा वापर केला जात आहे. त्यामुळे परिषदेने संत ही उपाधी देण्यासाठी एक प्रक्रिया निश्चित करण्याचे ठरवले आहे. यापुढे व्यक्तीची पडताळणी करुन त्याची छाननी केल्यानंतरच ही उपाधी प्रदान करण्यात येईल. जेणेकरून भविष्यात राम रहिमसारख्या बाबांना या उपाधीचा गैरवापर करण्यापासून रोखता येईल.
संत संपत्तीपासून दूर असतील
संत उपाधी देताना संबंधीत बाबाची जीवनशैली कशी आहे, नावावर रोख रक्कम व संपत्ती असू नये, जर संपत्ती असेल तर ती न्यासाची असेल त्याचा वापर लोककल्याणासाठी झाला पाहिजे, आदी बाबी आता आखाडा परिषद तपासून पाहणार आहे. लोकांनीही एखाद्या बाबाचे अनुयायी होण्यापुर्वी सर्वबाबी काळजीपुर्वक पाहिल्या पाहिजेत, असेही जैन यांनी सांगितले. अखिल भारतीय आखाडा परिषद ही चौदा आखाड्यांची संयुक्त संस्था असून यामध्ये निर्मोही आखाडाही आहे.
सावधान! हे आहेत भोंदू
आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या 14 भोंदू बाबांच्या यादीत बाबा गुरमीत राम रहिम, आसाराम ऊर्फ आशुमल शिरमानी, आसारामचा मुलगा नारायण साई, सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ, निर्मल बाबा ऊर्फ निर्मलजीत सिंह, सचिदानंत गिरी ऊर्फ सचिन दत्ता, ओम बाबा ऊर्फ विवेकानंद झा, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमुर्ती द्विवेदी, स्वामी आसीमानंद ऊर्फ ओम नम: शिवाय बाबा, खुशी मुनी, बृहस्पती गिरी आणि मलकान गिरी या कथित बाबा-महाराजांचा समावेश आहे.