भोंदूबाबाचा बलात्कार

0

मुंबई । पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे एका भोंदूबाबाने एका मुलीचे अपहरण करत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या भोंदूबाबाने मुलीला औषधे देण्याच्या नावाखाली जवळीक साधली आणि तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या प्रकारात या भोंदूबाबाला मोखाडा नगरपंचायतीच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा मंगला चौधरी तसेच जव्हार पोलिसांमध्ये शिपाई असलेला त्यांचा मुलगा संदीप चौधरी यानेही मदत केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून नगराध्यक्षा आणि त्यांच्या मुलासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. भोंदूबाबा त्याच्या दोन साथीदारांसोबत फरार झाला आहे.

सतत तीन महिने शोषण
त्र्यंबकमुणी मंगलमुणी दास बाबा असं या बलात्कारी भोंदूबाबाचे नाव आहे. तो गेल्या तीन महिन्यांपासून पीडित तरुणीवर खोडाळा, जव्हार, वलसाड, (गुजरात) अशा ठिकाणी नेऊन बलात्कार करत होता, अशी तक्रार पीडित तरुणीने मोखाडा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. मूळव्याधीवरचे औषध देण्याच्या निमित्ताने तसेच नोकरी देण्याचे आमिष दाखवत त्या बाबाने या मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या मुलीच्या सांगण्यानुसार त्यानंतर तिचे या बाबाने त्याच्या साथीदारांच्या साहाय्याने अपहरण करत तिला बळजबरीने त्याच्याशी लग्न करायला लावले. यानंतर तिच्यावर अनेकदा बलात्कार करण्यात आल्याचे या मुलीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच या मुलीला तिच्या घरी सोडताना झाला प्रकार कोणाला सांगितला तर वाईट होईल, अशी धमकीही त्या भोंदूबाबाने दिली आहे.

साथीदारांसह भोंदूबाबा फरार
पोलिसांत तक्रार केल्याचे कळताच हा भोंदूबाबा त्याच्या दोन साथीदारांसोबत फरार झाला असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या सगळ्या प्रकारात मोखाडा नगर पंचायतीच्या महिला नगराध्यक्षा मंगला चौधरी तसेच मोखाडा पोलिसांमध्ये असलेला त्यांचा मुलगा संदीप चौधरी या दोघांचा समावेश असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने संताप व्यक्त होत आहे.