भुसावळ। राष्ट्रीय बालशौर्य पदक विजेता निलेश भिल व त्याचा लहान भाऊ गणपत भिल या बेपत्ता झालेल्या मुलांचा मुक्ताईनगर पोलीस शोध घेत असतांना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन नोटांचा पाऊस पाडणारा भिवसन सखाराम गोपाळ उर्फ आदेशबाबा याला बोदवड तालुक्यातील हिंगणा शिवारात 25 रोजी अटक केली. या भोंदूबाबाकडून 500 रुपयांच्या तीन नोटा लावून तयार केलेल्या बनावट नोटांचे 21 बंडल तसेच साधनसामग्री व तलवार, कोयता, सुरा, हाडाची कवटी, पाच लोखंडी सळ्या, कलश, नारळ, स्टीलचा चाकू इत्यादी साहित्य मिळून आले होते.
केली संयुक्त कारवाई
मुक्ताईनगर व बोदवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन भोंदू आदेश बाबाला गजाआड केले. शुक्रवार 26 रोजी भोंदू बाबाला भुसावळ न्यायालयात दुपारी 2.30 वाजता हजर करण्यात आले होते. न्या. एस.एल. वैद्य यांनी भोंदू आदेश बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. याबाबत आरोपीतर्फे महेश भोकरीकर यांनी तर सरकारतर्फे अॅड. राजेश गवई यांनी काम पाहिले.