मध्यस्थी बेतली जीवावर ; पाच संशयीतांना अटक, खुनाचा गुन्हा
पिंपळगाव हरेश्वर- येथून जवळच असलेल्या भोकरी येथे सासरा-जावयातील कौटुंबिक वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, 26 रोजी सकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेत अदील अन्वर काकर (17, रा.भोकरी, ता.पाचोरा) या अल्पवयीन युवकाचा मृत्यू झाला. अटकेतील आरोपींमध्ये तीन पुरूषांसह दोन महिलांचा समावेश आहे.
मध्यस्थी बेतली युवकाच्या जीवावर
भोकरी गावातील रहिवासी अशपाक उर्फ इम्रान रशीद काकर (24) व त्यांचे सासरे हमीद करीम काकर यांच्यात भांडण सुरू असताना साक्षीदार समरीन अशपाक काकर, शबाना हमीद काकर, ईरफान हमीद काकर यांना मारहाण होत असताना भांडण सोडवण्यासाठी अदील अन्वर काकर (17) पुढे आल्याचा राग आल्याने संशयीत आरोपी अशपाक उर्फ इम्रान रशीद काकर (24), तौसीफ रशीद काकर (22), नसीबा रशीद काकर (40), शाहीन फिरोज काकर (25) व रशीद उस्मान काकर (41, सर्व रा.भोकरी, ता.पाचोरा) आदींनी त्यास जमिनीवर पाडून पोटावर, छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
जमाव संतप्त, आरोपींच्या अटकेची मागणी
अल्पवयीन तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईक संतप्त झाले, आधी सर्व आरोपींना अटक करा, नंतरच मृतदेह ताब्यात घेवू, अशी भूमिका मांडल्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मयतावर दफनविधी करण्यात आला. घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक केशव पातोंड, पिंपळगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी गावात धाव घेत शांतता प्रस्थापीत केली तसेच गावात कुठलीही अप्रिय घटना न घडल्यासाठी भडगाव, पहूर, जामनेर येथून पोलिसांचा जादा बंदोबस्त मागवण्यात आला.