धुळे । तालुक्यातील मौजे भोकर येथील नियोजित 33/11 विद्युत उपकेंद्रास ग्रामस्थांचा विरोध असून ही जागा भोकर शिवारात देवू नये अशी मागणी ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुळवते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नियोजित 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्रासाठी कार्यकारी अभियंता बांधकाम व सुव्यवस्था म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित जळगाव यांच्यासाठी जमीन मंजूर करण्यात आली आहे.
उपकेंद्र भोकर येथे होणार असले तरी भोकर गाव धुळे महागनर पालिकेच्या अंतर्गत यावे यासाठी प्रस्तावित असून भोकर येथील भूमीहीन मजूरांनी घरकुलांची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे. या भूमिहीन मजूरांना घरकुल बांधण्यासाठी या जमिनीचा वापर करण्यात येणार होता. परंतु, ही जागा जर म.रा.वि.वि. कंपनीला दिलीतर ग्रामपंचायतीला खाजगी जागा खरेदी करावी लागेल. या जमिनीऐवजी वडेल शिवरातील शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. याप्रसंगी सरपंच मंगलदास पाटील, उपसरपंच नाना पाटील, सदस्य गोपीचंद पाटील, मंगलाबाई पाटील, रत्नाबाई पाटील, संतोष पाटील, विजय पाटील, कैलास पाटील व किशोर पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.