वरणगाव। वरणगाव शहरातून भोगावती नदी पूर्वीपासून वाहत आहे. मात्र भोगावती नदीने अनेक वर्षापासून गटारीचे स्वरूप प्राप्त केल्याने नदीचे पात्र उथळ झाले असून त्यात घाण कचरा मोठ्या प्रमाणात साठवण निर्माण झाली आहे. त्यामुळे भोगावती नदीच्या सुशोभिकरण्यासाठी नदी पुनर्जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत भरीव निधीची तरतूद करणार असल्याचे आश्वासन जलसंधारणमंत्री राम शिंदे दिले. भुसावळ तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करण्यासाठी मंत्री शिंदे यांचे वरणगाव येथे आगमन झाले असता त्यांनी याबद्दल माहिती दिली.
ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत
प्रसंगी शुक्रवार 12 रोजी रामजी शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा असल्याने त्यांचा वरणगाव नगरपालिकेतर्फे ढोल ताशाच्या गजरात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे म्हणाले की, शहराच्या विकासात भर पडावी या दृष्टीकोनातून भोगावती नदीचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे. त्यामुळे नदीच्या सुशोभिकरण्यासाठी नदी पुनर्जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत भरीव निधीची तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
नगराध्यक्षांसह पदाधिकार्यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा अधिकारी किशोर राजे निंबाळकर, वरणगाव पालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्षा अरुणा इंगळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नरसेवक सुधाकर जावळे, बबलू माळी, गणेश धनगर, विकीन भंगाळे, गणेश चौधरी, डॉ. विनोद चौधरी, इरफान पिंजारी, साजीद कुरेशी, मिलींद मेढे, नगरसेविका वैशाली देशमुख, रोहिणी जावळे, ज्येष्ठ कार्यकर्ते अलाउद्दीन, शेख सईद, इफ्तेखार मिर्जा, हितेश चौधरी, प्रशांत मोरे, विवेक कुलकर्णी, निलेश सुरडकर, रमेश पालवे, गंभीर कोळी, संजय माळी, राजू गायकवाड, श्रीकृष्ण माळी, रामदास भोई, रविंद्र धनगर आदी उपस्थित होते तर मंत्री रामजी शिंदे यांचा धनगर जमाज व मुस्लीम पंचाच्या वतीने सत्कार करण्यात आला होता.
निवेदनाची घेतली दखल
पावसाळ्यात पावसाचे पाणी शहरातील लोकवस्तीत शिरुन जिवीतहानी होऊन थोडक्यात बचावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच दृष्टीकोनातून पालिकेच्या माध्यमातून गटनेते सुनील काळे व उपनगराध्यक्ष शेख अखलाक यांनी मुंबई मंत्रालयात जावून जलसंधारणमंत्री यांच्या दालनात निवेदन देण्यात आले होते.