भोजनाबाबत व्यथा मांडणारा जवान तेज बहादूर यादव अटकेत?

0

रेवाडी । निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचा सोशल मीडियाद्वारे भंडाफोड केल्याने चर्चेत आलेले सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यादव यांचा स्वेच्छा सेवानिवृत्तीचा (व्हीआरएस) अर्ज बीएसएफने फेटाळून लावला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत व्हीआरएस घेता येणार नाही, अशी ताकीद लष्कराने यादव यांना दिली आहे. याबाबत यादव यांच्या पत्नी शर्मिला यांनी प्रसारमाध्यमांकडे धाव घेत, बीएसएफने आपल्या पतीला अटक केली असून, त्यांच्या जीविताला धोका असल्याचा आरोप
केला आहे.

बीएसएफ म्हणते कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू..
सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईबद्दल शर्मिला यादव यांनी संशय व्यक्त केला असून, आपल्याला धमकाविल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, आपला मानसिक छळ होत असल्याचेही त्यांनी सांगितल्याने केंद्र सरकार व बीएसएफबद्दल पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. लष्करातून सेवानिवृत्तीसाठी यादव यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला होता. परंतु, तो तूर्त फेटाळण्यात आला आहे. यादव यांनी वरिष्ठ अधिकारी जवानांना निकृष्टदर्जाचे अन्न देत असल्याचा भंडाफोड केला होता. तसे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. तर केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याबाबत बीएसएफने सांगितले, की व्हीआरएसचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे यादव यांना यापूर्वीच सांगण्यात आले आहेत.

कुटुंबियांशी बोलू देत नाहीत
कोर्ट ऑफ इन्क्वायरीची एक पद्धत असून, त्यासाठी तपास पथक सर्व प्रकारच्या पुराव्यांची पडताळणी करत असते. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत जवानांना सुटी दिली जात नाही. सध्या यादव यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईदेखील सुरू आहे. अशा परिस्थितीत व्हीआरएस देण्याची परवानगी कुणीही देऊ शकत नाही, असेही बीएसएफने सांगितले. दरम्यान, यादव यांनी दूरध्वनीद्वारे पत्नीला दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दुपारी बारा वाजेपर्यंत व्हीआरएस मंजूर होईल, असे त्यांना बीएसएफकडून सांगण्यात आले होते. परंतु, दुपारी एक वाजता त्यांना अचानक व्हीआरएस रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.