यावल : तालुक्यातील सावखेडासीम परीसरात भोनक नदीच्या पात्रात शुक्रवारी अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या व्यक्तीची ओळख पटली असून तो साकळी येथील रहिवासी असून गंभीर उर्फ मनोज हबीब तडवी असे त्याचे नाव असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 4 जुलैपासून तडवी बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता व अखेर कपड्यावरून त्यांची ओळख पटली. सावखेडासीम, ता.यावल गावाजवळील सातपुडा पर्वतातून उगम पावणार्या भोनक नदीच्या पात्रामध्ये शुक्रवारी कुजलेल्या अवस्थेतील प्रेत पीक संरक्षण सोसायटीच्या पीक रक्षक रसुल नामदार तडवी व सिकंदर हिंमत तडवी यांना दिसले होते. घटनास्थळीच यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, पिंटू बागुल, भूषण गाजरे यांनी शवविच्छेदन करीत मयताचे कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यात बी. एस. टेलर असे नाव होते त्यावरून तपास केला असता साकळी गावातुन 4 जुलैपासुन गतीमंद असलेला तरूण गंभीर उर्फ मनोज हबीब तडवी हा असल्याचे समोर आले. शनीवारी तडवी कुटुंबीयांनी कपडे पाहून ओळख पटवली. मयत हरवल्याची 7 जुलै रोजी तक्रार देखील देण्यात आली होती. मयताच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी, मुलगी असा परीवार आहे.