मुक्ताईनगर : रस्ता ओलांडताना भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्याने 67 वर्षीय भाविक वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 25 मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील बोदवड चौफुली चौकाजवळ घडली. नारायण श्रीपत शेळके (67, भोनगाव, ता.शेगाव, जि.बुलढाणा) असे मयताचे नाव आहे.
रस्ता ओलांडताना वाहनाची धडक
बोदवड चौफुलीच्या उड्डाण पुलापुढे नारायण शेळके हे बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथून कोथळीकडे येत असताना पांढर्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट सारखी दिसणार्या अज्ञात वाहनावरील चालकाने जोरात धडक दिल्याने भाविक नारायण शेळके यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून धडक देऊन चालक वाहनासह पसार झाला. या प्रकरणी मयताचा भाचा सागर पाटील (सुळे, ता.मुक्ताईनगर) या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दिशादर्शक फलकांचा अभाव
मुक्ताईनगर शहरातून जुनी कोथळी किंवा नवीन मुक्ताई मंदिराकडे जाताना महामार्गावर नगरपंचायतीने कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक बसवलेले नाहीत परीणामी बाहेर गावावरून आलेल्या भाविक प्रवाशांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मुक्ताई मंदिर कुठे आहे, जुने मंदिर कुठे आहे कोणत्या रस्त्याने आहे असे विचारावे लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाने किंवा नगरपंचायतीने रस्त्यावर मंदिराकडे जाणार्या येणार्या मार्गावर दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी जोर धरत आहे.