भोपाळ-उज्जैन पॅसेंजर स्फोटामागे ईसिस : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

0

भोपाळ : मंगळवारी भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटामागे आयसिस या अतिरेकी संघटनेचा हात असल्याचा दावा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. बॉम्ब रेल्वेत ठेवल्यानंतर अतिरेक्यांनी त्याचे छायाचित्र सीरियात पाठवले होते. याचे पुरावेदेखील आमच्या हाती लागले आहेत, अशी माहिती चौहान यांनी दिली. मंगळवारी मध्यप्रदेशमध्ये कालापिपल स्थानकाजवळ शाजापूर येथे भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात 12 प्रवाशी जखमी झाले होते. हा स्फोट आयसिस या अतिरेकी संघटनेने घडवून आणला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

अमोनियम नायट्रेटचा वापर

या स्फोटाचा तपास पोलिसांनी सुरू केल्यानंतर मध्यप्रदेशमधील पिपरियामधून एकाला ताब्यात घेतले. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार या व्यक्तीने ट्रेनमधील स्फोटात वापरण्यात आलेल्या बॉम्बचे छायाचित्र सीरियात पाठवल्याचे समोर आले आहे. भोपाळमधून आलेल्या तीन जणांनी स्फोट घडवल्याची माहिती आहे. स्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला आहे. ईसिस संघटनेकडूनही याच रसायनाचा वापर करण्यात येतो.

देशभरात धरपकड

देशभरातील गुप्तचर यंत्रणाही भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेन स्फोटानंतर तपासाला लागल्या आहेत. तेलंगणा पोलिसांनी स्फोटानंतर मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. या माहितीच्या आधारे मध्यप्रदेश पोलिसांना तीन जणांना पकडले. इराक आणि सीरियात क्रूरकृत्यांनी दहशत निर्माण करणार्‍या आयसिसने प्रथमच भारतात बॉम्बस्फोट घडवला आहे.