भोरटेकला शॉर्टसर्किटने घर खाक

0

वीज मीटर स्पार्किंगने घराला लागली आग : संसारोपयोगी वस्तूही जळाल्या

भुसावळ: शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या भोरटेक (ता.यावल) येथे विद्युत मीटरमध्ये वीज प्रवाह (हाय व्होल्टेज) वाढल्याने शॉर्टसर्किटने घराला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूंसह टीव्ही, कुलूर, फ्रीज आदी वस्तूंचा अक्षरशा कोळसा झाला. घराला आग लागल्यानंतर कुटुंबप्रमुखाने सतर्कता बाळगत सदस्यांना वेळीच बाहेर काढल्याने प्राणहानी टळली मात्र आगीत संपूर्ण घरातील वस्तूंचा कोळसा झाल्याने कुटुंब उघड्यावर आले. प्रशासनाने पंचनामा केला असून तातडीने या कुटुंबास मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या अकलूर गावाजवळ अवघ्या 90 घरे असलेल्या भोरटेक गावात शेतकरी रवींद्र मोतीराम कोळी हे पत्नी, दोन मुले व भाऊ, वहिनी व दोघा पुतण्यांसह राहतात. मंगळवारी सकाळी कुटुंबाची शेतात जाण्यासाठी लगबग सुरू असतानाच विद्युत मीटरमध्ये अचानक प्रवाह वाढल्याने शॉर्टसर्किट होवून वायरींगने पेट घेतला. पाहता-पाहता आग घरापर्यंत पोहोचल्याने कुटुंबाची त्रेधा-तिरपीट उडाली. शेतकरी रवींद्र कोळी यांनी सतर्कता दाखवत घरातील सदस्यांना लागलीच बाहेर काढल्याने प्राणहानी टळली मात्र आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने घरातील संपूर्ण वस्तूंचा कोळसा झाला.

भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींना आगीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेत दहा हजारांची मदत दिली तर भुसावळचे माजी नगरसेवक शेखर चुडामण इंगळे यांनी पाच हजारांची मदत तसेच धान्याची मदत करीत कुटुंबाला धीर दिला. दरम्यान, प्रशासनानेदेखील या कुटुंबाला मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

अर्ध्या तासानंतर आगीवर नियत्रण

आगीने संपूर्ण घराला विळखा घातल्याने पाहता-पाहता घरातील संसारोपयोगी वस्तूंसह धान्य, टीव्ही, फ्रीज, कुलर, भांडे-कुंडे तसेच अन्य वस्तूंना आगीचा फटका बसला तसेच घरातील सुमारे 15 हजारांची रोकडही आगीत जळाली. आगीनंतर गावातील तरुणांसह ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा करीत सुमारे अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कोळी कुटुंबियांनी सांगितले. या आगीमुळे सिमेंटच्या घराला तडे गेल्यानेही
नुकसान झाले.