महादेव जानकर यांची मागणी : दुष्काळ परिस्थितीची पाहणी
भोर : भोर तालुक्यातील महसूलच्या आठ मंडलांपैकी एकाच मंडलमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. इतर सात मंडलांच्या गावांतदेखील पाण्याची, पिकाची कठीण परिस्थिती असून, या तालुक्यातील इतर भागांचादेखील दुष्काळात समावेश करावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.
जानकर भोर तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी एकदिवसीय दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील किवत, गवडी, म्हाकोशी शिंद, नांद अशा अनेक गावांना भेट दिली. यादरम्यान कापूरव्होळ येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली.
सरकारने शेतकर्यांची विजबिले माफ केली आहेत. दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी सरकार अनुदान देत असून, आतापर्यंत 1500 कोटी रुपये अनुदान देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील रस्ते खूपच खराब आहेत, त्यासाठी जास्त निधी मिळावा, म्हणून प्रयत्न करणार असून, तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी प्रांताधिकार्यांना तालुक्याचा डीपीआर तयार करण्यास सांगणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.