नारायणगाव । वीज, पिण्याचे पाणी आणि रस्त्यांची रखडलेली कामे यांसारखे अशा अनेक सुविधांचा भोरमध्ये बोजवारा उडला आहे. नागरी सुविधा मिळत नसल्याने यासाठी जबाबदार असलेल्या शासकीय यंत्रणेच्या निषेधार्थ ज्येष्ठ नागरिक सोमवारी (दि. 14) भोरच्या तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे आत्मक्लेश लाक्षणिक उपोषण करणार आहेत. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महावितरण, पोलिस निरीक्षक, आमदारांना देण्यात आले आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरात, ग्रामीण भागांत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. तसेच पाण्याचे शुद्धीकरणही होत नसल्याने अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला केला जात आहे. भोर नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे येथील जेष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू असलेली रस्त्यांची कामे कासवगतीने चालू असून अपुर्णावस्थेत आहेत. त्यामुळे सर्वांनाच याचा मोठा त्रास सहन कराव लागतो. या कामांवर कोणाचेही नियंत्रण नाही. सुरू असलेले कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचे बोलले जात आहे. अर्धवट काम झालेल्या रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले आहे.
शहरातील वीज पुरवठा रामभरोसे आहे. कधी दोन तास, तर कधी दिवसभर वीज दुरुस्तीच्या नावाखाली गायब होते. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने गैरसोय होते. याविषयी अनेकदा वृत्तपत्रांतून आवाज उठविण्यात आला आहे. परंतु तरीदेखिल त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आत्मक्लेश लाक्षणिक उपोषण करावे लागत असल्याचे जेष्ठ नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डी. जी. सहस्रबुद्धे, सुरेश शेटे, जेष्ठ नागरिक संघाचे डी. जी. सावंत, सुरेश शिंदे, पुरुषोत्तम मुसळे आदींच्या सह्या आहेत. या निवेदनाची प्रत भोर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांनाही देण्यात आली आहे.