भोर । अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियनने कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार (दि. 16) पासून पुकारलेल्या बेमुदत संपामुळे भोर तालुक्यातील डाक सेवा तीन दिवसांपासून ठप्प आहे.
या संपात भोर, वेल्हा तालुक्यातील डाक सेवक सहभागी झाले असून ग्रामीण डाक सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, डाक सेवकांना पोस्ट खात्यात सामावून घ्यावे, कमलेशचंद्र कमिटीने केलेल्या शिफारशी लागू कराव्यात, या आणि इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियनने हा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात भोर, वेल्हा, खेड शिवापूर, नसरापूर आणि पानशेत विभागातील सर्व डाक सेवक सहभागी झाले असल्याने ग्रामीण भागातील डाक सेवा ठप्प झाली आहे. हा संप यशस्वी करण्यासाठी भोर उपविभागातील सर्व कर्मचार्यांची गुरुवारी भोर येथे बैठक घेण्यात आली. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. संपाचा शुक्रवारी तिसरा दिवस आहे. या बैठकीत संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजी मांढरे, पोपट गोळे, मनोज कुंभार, चंद्रकांत जाधव, संतोष बुदगुडे, सुभाष साळेकर, दत्तात्रय वरे आदींसह अनेक कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू ठेवण्याचा निर्धार या डाक सेवकांनी केला आहे. त्यामुळे टपाल सेवेवर मोठा विपरीत परीणाम झाला आहे.
या डाक सेवकांनी पुकारलेल्या बेमुदत संपास तालुक्यातील विविध सेवाभावी आणि सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला असून, या संपाचे भोर तालुका भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमर बुदगुडे यांनी समर्थन केले असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले.