पुणे । भोवरा, काचबांगड्या, सागरगोट्या यांसारख्या लुप्त होत चाललेल्या पारंपरिक खेळांमध्ये ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या मुलांसह पुण्यातील अनाथ आणि विशेष मुले रमली. बालदिनाचे औचित्य साधून आयोजित बाल आनंद जत्रेमध्ये पंडित नेहरुंच्या वेशातील कलाकार चिमुकल्यांच्या भेटीला आल्याने प्रत्येकाच्याच चेहर्यावर हसू उमलले होते. खेळ, गाणी, गोष्टींसह सर्वांगीण विकासाकरीता योगा, सूर्यनमस्कार, लाफ्टर थेरेपीचे महत्त्व पटवून देत तरुणाईने तब्बल 200 मुलांसोबत बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
गीता परिवार आणि निरंजन सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नारायण पेठेतील गोगटे प्रशालेमध्ये ही बाल आनंद जत्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गीता परिवाराच्या अध्यक्ष संतोषी मुंदडा, सचिव शाम मणियार, खजिनदार व्यास वल्लभ, संगीता मणियार, अंजली तापडीया, शुभांगी जाजू, निर्मला गांधी, वृंदा देशपांडे, तृप्ती खंडेलवाल, संजना शहा, चित्रा बेलूरे, सिद्धी सोमाणी यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनाथ, विशेष आणि शेतकर्यांच्या मुलांना एकत्र आणून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासोबत एकमेकांशी संवाद साधण्याकरीता यानिमित्ताने प्रयत्न करण्यात आले.
विविध संस्थांमधील मुलांचा सहभाग
समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेल्या विशेष आणि अनाथ मुलांसह शेतकर्यांच्या मुलांसाठी बालदिनानिमित्त प्रथमच पुण्यामध्ये बाल आनंद जत्रेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील मुलांना पुण्यामध्ये बोलावून त्यांच्यासोबत एकदिवस एकत्रित घालविण्याचा आनंद वेगळा आहे, असे संतोषी मुदंडा यांनी सांगितले. रायगड येथील ताक विकणार्या महिलांच्या मुलांसह शेतकर्यांची मुले, मुळशीमधील नांदगाव येथील शेतकर्यांची मुले आणि पुण्यातील वंचित विकास, घरटं, गोविंद बालसंस्कार केंद्र फोर्ब्स मार्शल, सर्वेशाम आदी संस्थांतील मुला-मुलींनी बाल आनंद जत्रेमध्ये सहभाग घेतला होता.
चिमुकल्यांनी लुटला खेळाचा आनंद
पंडित नेहरुंच्या वेशातील कलाकाराचे जत्रेमध्ये आगमन होताच, चिमुकल्यांनी त्यांच्याभोवती गराडा घालत गुलाबाची फुले देऊन त्यांचे स्वागत केले. याशिवाय आटयापाटया, लगोरी, विटीदांडू, गोट्या यांसारख्या नानाविध पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद चिमुकल्यांनी लुटला. संपूर्ण दिवसभर आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्वच्छता व संस्कार, प्रज्ञा संवर्धन, व्यक्तिमत्त्व विकास यांसह अनेक विषयांवर मुलांशी संवाद साधून प्रात्यक्षिकांद्वारे त्यांना सहभागी करून घेण्यात आले.