पहिल्या टप्प्यात सव्वा कोटी, अर्धवट कामासाठी पावणेदोन कोटी
आजी-माजी आमदारांच्या वादात बांधकाम सहा वर्षे रखडले
पिंपरी-चिंचवड : भोसरीच्या लांडेवाडीत आजी-माजी आमदारांच्या राजकीय वादातून कमानीचे काम रखडले असून त्याची संपूर्ण शहरात चर्चा आहे. राजमाता जिजाऊ महाविद्यालयाकडे जाणार्या मार्गावर पालिकेने सहा वर्षांपूर्वी या कमानीचे काम सुरू केले. प हिल्या टप्प्यात एक कोटी 24 लाख रुपये खर्च करूनही अर्धवट राहिलेल्या या कमानीच्या उर्वरित कामासाठी एक कोटी 77 लाख रुपये नव्याने खर्च करण्यात येणार आहेत. कमानीसाठी तीन कोटींहून अधिक खर्च होणार असल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.
हे देखील वाचा
शहरात कमानींचे फॅड
पिंपरी-चिंचवड शहरात कमानी उभारण्याचे फॅड जुने आहे. आवश्यकता आहे की नाही, याची खातरजमा न करता शहरातील बहुतेक सर्वच भागात कमानी उभारण्यात आल्या असून त्यासाठी कोटयवधी रुपये खर्च झाले आहेत. अनेक ठिकाणी कमानीच्या नामकरणावरून वाद झाले आहेत. मात्र, अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही. सुमारे 65 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. उर्वरित काम रखडले आहे, त्याचे कारण उघड होऊ शकले नाही. कमानीच्या कामासाठी निधी नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, खरे कारण वेगळेच असल्याची चर्चा आहे. आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्यातील वर्चस्ववादाचे राजकारण त्यामागे असल्याचे सांगितले जाते. कमानीचे काम रखडल्यामुळे अनेकदा टीका झाली. मात्र परिस्थिती जैसे थे आहे. अधिकार्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. कमानीच्या मुद्यावरून कोणताही राजकीय वाद नसल्याचा दावा पालिका अधिकारी करत होते.
नव्याने खर्चाचा प्रस्ताव
कमानीच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी सव्वा कोटी रुपये खर्च झाल्यानंतर ते अध्र्यातच बंद पडले. उर्वरित कामासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता तरी या कमानीला मुहूर्त लाभणार का, अशी विचारणा करण्यात येत आहे. या संदर्भात, कोणतेही भाष्य करण्यास अधिकारी तयार नाहीत.