निवडणूक फिव्हर : आपलाच कार्यक्रम जंगी होण्यासाठी कमालीची चढोओढ
पिंपरी चिंचवड (बापू जगदाळे) : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या इफ्तार पार्ट्यांना चांगलाच राजकीय रंग चढृ लागला आहे. भोसरीतील आजी-माजी आमदारांमध्ये कोणाचा कार्यक्रम जंगी यावरून कमालीची चढाओढ सुरू झाली आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून स्वत:चे ब्रँडिंग करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी काही दिवसापुर्वी भोसरीत इंद्रायणी मंगल कार्यालयात इफ्तार पार्टीच्या जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याच धर्तीवर बुधवारी माजी आमदार विलास लांडेे गटानेही नेहरूनगर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे सध्या इफ्तार पार्ट्यांमधून राजकीय वारे वाहू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्हीही नेते निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जय्यत तयारी करत असल्याचे संकेत या माध्यमातून मिळत आहेत.
भोसरीत मुस्लिमांची संख्या अधिक
भोसरी विधानसभा मतदार संघाची निवडणूक नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असते. पिंपरी चिंचवडच्या औद्योगिकनगरीत राज्यभरातील हजारो कष्टकरी काम करत आहेत. त्यांचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षाकडून होत असतो. याशिवाय भोसरी मतदार संघात असलेली मुस्लिमांची संख्या पाहता त्यांची मते निर्णायक ठरू शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन इफ्तार पार्टीच्या माध्यमातून ती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांकडून होताना दिसत आहे. सध्या भाजपावर असलेला नागरीकांचा रोष कमी करण्यासाठी भाजप नेत्याकडून तर या विरोधाचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून अशा कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे. पण हे कार्यक्रम अनेक वर्षा पासून आम्ही घेत असल्याचे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्याकडून सांगितले जात आहे.
वाढदिवसानंतर लांडेचे शक्तिप्रदर्शन
गेल्या विधानसभा निवडणुकीत विलास लांडे यांना आपला व पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला आपला बालेकिल्ला राखण्यात अपयश आले होते. तो पराभव सर्वांनाच आत्मपरीक्षण करायला लावणारा होता. यानंतर नेते व कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतेच हल्लाबोल आंदोलन केले. तसेच लांडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत व या कार्यक्रमाला भाजपाचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचीच उपस्थिती ठेवत चाणाक्षपणा दाखवला. यामुळे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यात लांडे यशस्वी झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या जोमाने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाली आहे. तसेच लांडे यांनाही वरिष्ठ नेत्यांकडून कानमंत्र मिळाल्यामुळे तेही भोसरीच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. हे त्यांचा धूमधडाक्यात साजरा केलेल्या वाढदिवसावरुन दिसून आलेच. या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. इफ्तार पार्टीचे आयोजन हादेखील त्यांच्या रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.
आमदार लांडगेंचा मतदारसंघात दबदबा
आमदार महेश लांडगे यांनी गेल्या चार वर्षांत आपल्या मतदार संघात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र सध्या ते भाजपाचे सहयोगी आमदार आहेत आणि भाजपा हिंदुत्वाचा मुद्दा रेटण्यासाठी एकही संधी सोडत नाही, हा इतिहास आहे. असे असले तरीही सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याचा भाजपाचा अजेंडा राहिला आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाला आपल्याकडे वळविण्यासाठी आमदार लांडे इफ्तार पार्टीच्या आयोजनाची संधी उत्तमपणे साधली आहे, असे बोलले जात आहे.
लांडगे तिकिटावर लढणार कि अपक्ष?
गेल्या निवडणुकीत लांडगे शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र ती न मिळाल्याने कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला न जाता अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि जिंकूनही दाखविली. त्यानंतर मात्र त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. सध्या भाजपाचे सहयोगी आमदार म्हणून ते कार्यरत आहेत. विकासकामांच्या माध्यमातून आपल्या मतदार संघावर पकड ठेवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. मात्र आगामी निवडणुकीत ते अपक्ष लढणार की कोणत्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर लढणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इफ्तार पार्ट्यांना राजकीय इव्हेंटचे स्वरूप !
मुस्लिम समाजाची मने आणि मते आपल्याकडे वळविण्यासाठी इफ्तार पार्टी हा आता एक राजकीय इव्हेंट ठरू लागला आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी राजकीय पक्षांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात आहे. आमदार लांडगे यांच्यानंतर दोनच दिवसांत माजी आमदार लांडे गटाने इफ्तार पार्टीचे आयोजन करून ‘हम भी किसीसे कम नही’ हेच दाखवून दिले आहे. दरम्यान, दोन्हीही नेते आगामी निवडणुकीला सर्व ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हे मात्र नक्की.