भोसरीतील बिल्डरच्या खुनाचा कट उधळला

0

सातार्‍याच्या सराईत गुंडाला अटक; नाथाजी महाराजाने दिली होती 20 लाखांची सुपारी

पिंपरी-चिंचवड : पुण्यात बिल्डरवर गोळ्या झाडून त्याचा खून केल्याचे प्रकरण ताजे असतानाच भोसरी येथील एका बिल्डरच्या हत्येचा कट उधळला आहे. या प्रकरणी पुणे गुन्हे अन्वेषण शाखेने सातारा येथील कुख्यात गुंडाला अटक केली आहे. ही सुपारी चाकण परिसरातीलच एका महाराजाने दिल्याचे पुढे आले आहे. अमोल संपत मदने (वय 32 रा. वनवडी, कर्‍हाड) असे या गुंडांचे नाव आहे. उदयसिंह चव्हाण उर्फ नाथजी महाराज व त्याच्या एका नातेवाईकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित रामभाऊ लांडगे (वय 33, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आश्रमाच्या अडचणीसाठी मागितले 35 लाख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित लांडगे यांचा उदयसिंह चव्हाण उर्फ नाथजी महाराज याच्याशी संपर्क आला. चव्हाण याचा सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथील आसवले गाव येथे मोठा आश्रम आहे. नाथजी महाराज म्हणून त्याची पंचक्रोशीत ख्याती देखील आहे. अमित हे पिंपरी-चिंचवड येथे मोठे बिल्डर असल्याचे समजताच चव्हाण याने जानेवारी 2017 मध्ये अमित यांचा विश्‍वास संपादन केला. या ओळखीचा फायदा घेत चव्हाण याने आश्रमाची अडचण सांगत अमित यांच्याकडे एकदा 18 लाख तर दुसर्‍यांदा 17 लाख मागितले.

पैसे न दिल्याने खुनाची सुपारी
मात्र एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे अमित यांनी महाराजाला सांगितले. याचा राग घरून जानेवारी 2018 मध्ये चव्हाण याने अमोल मदने याला 20 लाखांची सुपारी दिली. या प्रकरणाची पुसटशी माहिती सांगवी पोलिसांकडून अमित यांना मिळाली. याबाबत खात्री झाल्यानंतर अमित यांनी थेट पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधला. ही माहिती आयुक्तालयाने पुणे गुन्हे अन्वेषण शाखेला दिली. अन्वेषण शाखेने केलेल्या तपासात ही सुपारी मदनेला दिल्याचे उघड झाले.

नातेवाईकासह महाराज फरार
मदने याच्यावर सातारा परिसरात खून, खंडणी, अपहरण असे गंभीर गु्हे दाखल आहेत. पोलिसांनी मदनेला सातारा येथून अटक केल्याने खुनाचा मोठा कट वेळीच उधळला. मात्र नाथजी महाराज व त्याचा नातेवाईक हे दोघे गेल्या दोन दिवसापासून फरार आहेत.

पुणे गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अन्सार शेख, कर्मचारी दिनेश गडांकुश, सिराज शेख, अस्लमखान पठाण, अजय खराडे, राजू केदारी, किरण पवार, किशोर वग्गू, अजित फरांदे, प्रसाद जंगिलवाड, चंद्रकांत महाजन, गणेश नरूटे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.