भोसरीतील विजेचा लंपडाव संपणार, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरु

0

धोकादायक ट्रान्सफॉर्मर हटविले, आमदार महेश लांडगे यांची माहिती

पिंपरी :- पिंपरी महापालिकेत समाविष्ट झालेल्या भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावातील विजेचा लपंडाव संपणार आहे. चऱ्होली, वडमुखवाडी, मोशीसह भोसरी मतदारसंघात आवश्यकतेनुसार महावितरणने नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत होणार नाही. तसेच धोकादायक ट्रान्सफॉर्मर महावितरणे हटवल्यामुळे संभाव्य धोका टाळला आहे. याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा कामाचा टाटा मोटर्स एम्प्लोईज युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे यांच्या हस्ते आज (बुधवारी) शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहर सुधारणा समितीचे सभापती राजेंद्र लांडगे, नगरसेविका नम्रता लोंढे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत सदस्य गोपीकृष्ण धावडे, राजश्री शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोईनवाड, युवा नेते स्वप्निल लांडगे, शिवराज लांडगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

महावितरण विभागामार्फत भोसरी मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी वीज खंडीत होण्याचे प्रकार वाढले होते. वीजपुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. वीजपुरवठा खंडीत होण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी  विशेष प्रयत्न करत जिल्हा नियोजन समिती व प्रणाली बळकटीकरण योजने मधून निधी मंजूर करुन घेतला. 

त्यानुसार भगतवस्ती येथे 630 केवी एचे नवीन ट्रान्सफॉर्मर ज्यादा क्षमतेचा, सेक्टर 10 एमआयडीसी भोसरी येथे सद्यस्थितीतील ट्रान्सफॉर्मरवर जादा क्षमतेचा 315 केवी ए, साई मंदिर वडमुखवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. च-होली बैलघाट येथे नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर झालेला आहे. तसेच कोतवालवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर 630 केवी मंजूर झाला असून काम चालू करण्यात येणार आहे. चऱ्होली स्मशानभूमी येथे नागरिकांच्या मागणीनुसार नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे.

तसेच सेक्टर 6 मोशी प्राधिकरण येथे तीनशे वीस मीटर लांबीची केबल नसल्यामुळे वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले होते. केबल उपलब्ध करून दिली आहे. तसेच गायकवाड वस्ती मोशी याठिकाणी वीज खंडीत होण्याचे प्रमाण असून सदर ठिकाणी केबल महावितरण कार्यालय प्राप्त होताच केबल टाकून प्रश्न सोडवला जाणार आहे.  मोशी आल्हाट वस्ती येथे रहदारीच्या ठिकाणी अडथळा ठरणारा ट्रान्सफॉर्मरही स्थलांतरित करण्यात आला आहे. त्याचबरोबर काळी भिंत चऱ्होली याठिकाणी अस्तित्वात असलेला धोकादायक ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याची मागणी शेतकर्‍यांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली होती. त्यानुसार हा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित केला आहे.