भोसरीतील संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुलाची दुरवस्था

0

मैदानात म्हशी सोडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केला निषेध

भोसरी : येथील इंद्रायनीनगर, प्रभाग क्रमांक 8 मधील श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. संकुलात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे खेळाडूंना सराव करण्यासाठी अडचणी येत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी या संकुलात म्हशी सोडून राष्ट्रवादीचे नगरसेवक विक्रांत लांडे यांनी प्रशासनाचा आणि सत्ताधार्‍यांचा निषेध केला.

कोट्यवधी रुपये पाण्यात
भोसरी, इंद्रायणीनगर येथे श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने या संकुलाची निर्मिती केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिंथेटिक ट्रॅक त्याचबरोबर गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी या खेळांबरोबर इनडोअर गेमचाही या संकुलात समावेश आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवरील खेळाडू या ठिकाणी सराव करण्यासाठी येतात. मात्र, सद्यस्थितीत क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली असून, खेळाडुंना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची स्थिती आहे.

पाठपुरावा करुनही दखल नाही
याबाबत बोलताना नगरसेवक विक्रांत लांडे म्हणाले, श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. मैदानात गवत वाढले आहे. मैदानातील गवत काढावे, यासाठी आपण आठ दिवसांपूर्वीच आयुक्त श्रावण हर्डीकर आणि क्रीडा विभागाकडे पाठपुरावा केला होता. मात्र, तरीही मैदानातील गवत काढण्यात आले नाही. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिका एकीकडे स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र, ज्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. त्याठिकाणी राबविले जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे. क्रीडा विभागाकडे गवत कापण्याच्या दोन मशिन होत्या. त्या नादुरुस्त झाल्याचे सांगितले जात आहे, असे नगरसेवक लांडे यांनी सांगितले.