पिंपरी : भोसरीत मतदारसंघातील दूध न देणार्या गायी, आजारी, अपंग गायींचे संगोपन होणार आहे. गोपालन करणा-या चंद्रभागा गो शाळा संवर्धन ट्रस्टला महापालिका गोशाळा आणि गुरांचा गोठा असलेली आरक्षित जागा गोशाळा चालविण्यासाठी देणार आहे. त्यामुळे भोसरीतील गायींचे संगोपन होणार आहे. याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. चिखलीतील चंद्रभागा गो शाळा संवर्धन ट्रस्टला ही संस्था गोपालन क्षेत्रात देशी गायींचे संगोपन करते. त्यामध्ये संस्थेचे उल्लेखनीय काम असून सेवाभावी वृत्तीने संस्था काम करत आहे. त्यांच्याकडील जागा अपुरी पडत होती. त्यामुळे गायांचे संगोपन करण्यासाठी गैरसोय होत होती. त्यामुळे या संस्थेला महापालिकेची चिखलीतील कोंडवाड्याची आरक्षित जागा देण्याची सूचना आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला केली होती.
पशुवैद्यकीय विभागाचे नियंत्रण…
महापालिकेचे चिखली येथील गट क्रमांक 1,655/2, आरक्षण क्रमांक 1/79 ही जागा कोंडवाड्यासाठी आरक्षित जागा पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. जागेचा ताबा पशुवैद्यकीय विभागाकडे ठेवून चंद्रभागा संस्थेला गोशाळा चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात आला आहे.
आरक्षित जागेत नियोजन…
आमदार महेश लांडगे म्हणाले, ”चंद्रभागा गोशाळा संवर्धन संस्था ट्रस्ट ही संस्था गायींचे संगोपन करत. गेल्या 12 वर्षांपासून गोपालन क्षेत्रात कार्यरत आहे. देशी गायींचे संगोपन करणे हे या संस्थेचा हेतू आहे. त्यांच्याकडील जागा कमी पडत होती. त्यामुळे त्यांना महापालिकेची आरक्षित जागा देण्यात येणार आहे. भोसरी मतदारसंघातील दूध न देणाऱ्या गायी, आजारी किंवा अपंग जनावरांचा सांभाळ केला जाणार आहे. त्यांना आहार पुरविण्याचे संस्थेचे नियोजन आहे”.