गीतांजलि एक्सप्रेस मधून आरोपींना पकडले
भुसावळ : कोयत्याने वार करत एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी पुण्यातील भोसरी येथे घडली. या घटनेत सनाऊल हक सय्यद शेख (वय 32, सागर लांडगे चाळ, भोसरी) या तरुणाचा खून झाला तर आरोपी गीतांजलि एक्सप्रेसने हावडाकडे पळून जात असल्याची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ व लोहमार्ग पोलिसांनी त्यांना दुपारी दोन वाजता अटक करत त्यांना जळगाव गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. सदर गुन्ह्यातील आरोपी शेख रूबेल शेख शायदुल यांच्यासह इतर तीन अल्पवयीन साथिदार असल्याचे समजते.
यांनी केली आरोपींना अटक
खुनानंतर चारही आरोपी गीतांजली एक्सप्रेसने मुंबई ते हावड़ा प्रवास करत असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार यांना मिळाल्याने बाजारपेठ डीबी पथकातील अंबादास पाथरवट, युवराज नागरुत, कृष्णा देशमुख, जयराम खोडपे, सुनिल थोरात, नरेंद्र चौधरी, दीपक जाधव, संजय भदाणे, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, विनोद वितकर, ईश्वर भालेराव अश्यांनी लागलीच रेल्वे स्टेशनवर जावुन गीतांजली एक्सप्रेसची बारकाईने पाहणी केली असता तेव्हा चारही आरोपी मिळुन आले. त्यांना पुढिल कारवाईसाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
व्यवसायाच्या वादातून खून झाल्याचा संशय
रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास दशक्रिया जवळील मोकळ्या मैदानात एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाने भोसरी पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एका व्यक्तीचा खून झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाजवळील कागदपत्रांची पाहणी करून त्यानुसार संपर्क केला असता आलेल्या व्यक्तींनी मयताची ओळख पटवली. मयत व्यक्तीचे भोसरीमध्ये भागीदारीत रस्त्यावर तीन ठिकाणी ज्यूसचे गाळे आहेत. रात्री दहा वाजताच्या सुमारास दोघे जण त्यास बोलविण्यासाठी आले होते. त्यानंतर पुन्हा ते आपल्या घरी आले नाहीत. सकाळी त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. व्यवसायाच्या वादातून या व्यक्तीचा खून झाल्याचे समजते.