आमदार महेश लांडगे वाढदिवसानिमित्त मतदारसंघ निघाला ढवळुन; मुख्य रस्ते, चौकांमध्ये भरभरून फ्लेक्स : मंत्रीपद मिळाल्याचाच सर्वत्र मजकूर
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी मतदारसंघाची कोणत्या ना कोणत्या कारणांनी नेहमीच चर्चा असते. या चर्चेचे केंद्रबिंदू हे आमदार महेश लांडगे असल्याचे पाहिला मिळते. कधी त्यांचा परदेश दौरा रंगतो, तर कधी दादांचे सैराट नृत्य. आताही तशी चर्चा आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमीत्त सुरु आहे. या चर्चेमुळे त्यांचे राजकीय वजन पुन्हा एकदा वाढण्यास मदत होत आहे. हे वजन त्यांना कोणत्या पदापर्यत घेऊन जाणार हे वाढदिवसानंतरच शहराला कळेल. त्यानिमीत्ताने मात्र पुन्हा एकदा लांडगे यांनी शहरातील राजकीय पटलावर सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास यश मिळवले आहे. त्यामुळे भोसरी सध्या दादामय झाल्याचे दिसून येत असून मतदारसंघात सर्वत्रच दादांचाच बोलबाला असल्याचे चित्र दिसत आहे.
मंत्रीपद मिळण्यात नाव आघाडीवर
लांडगे यांनी नेहमीच विधीमंडळात मतदारसंघातील अनेक समस्या मांडत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एवढेच नाहीतर मतदारसंघातील अनेक विकासकामांना देखील चालना मिळवून दिली आहे. त्यामुळे लांडगे यांची कार्यपध्दती लोकप्रिय होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्याच जाळे वाढत आहे. याचा प्रत्यय महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील त्यांच्या विरोधकांना आला आहे. सध्या राज्यपातळीवर मंत्रीपदाची जोरदार चर्चा असून यातील एक मंत्रीपद पिंपरी चिंचवड शहराला मिळु शकेल असे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. यामध्ये आमदार लांडगे यांचे नाव देखील आघाडीवर आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.
प्रत्येक प्रभागात जंगी कार्यक्रमांचे आयोजन
त्याचबरोबर पुढील लोकसभेसाठी लांडगे हे शिरुर लोकसभेचे संभाव्य उमेदवार गणले जात आहेत. तशी त्यांनी तयारीही सुरु केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांना अजुन अवधी असला तरी त्या निवडणुकीची तयारी म्हणुच या सर्व कार्यक्रमाकडे पाहिले जाते. हेही तितकेच खरे आहे. त्यामुळेच मतदारसंघात त्या निमीत्ताने मोठ मोठे जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात अले असून मतदारसंघातील असा एकही प्रभाग राहिला नाही की तिथे आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमीत्त काही कार्यक्रम आयोजीत नाही. चिखलीमध्ये ‘चला हवा येऊ द्या’, चर्होलीमध्ये ‘खेळ पैठणी’चा, भोसरीत ‘आयुष्यावर बोलू’ काही तसेच विविध खेळ प्रकारांच्या स्पर्धांचे देखील आयोजन केले आहे. भोसरीत गायरान मैदानावर देखील भव्य व्यासपीठ तयार केले जात आहे. यादिवशी जिल्हयातून व जिल्ह्या बाहेरुन अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्ति शुभेच्छा देण्यासाठी हजर राहणार आहेत. तर शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक भागात दादांचे शुभेच्छा बॅनर झळकत असून याला राजकीय किनारही लाभत आहे. पण या आयोजनामुळे मात्र सर्व भोसरी मतदारसंघ ढवळून निघाला असून लांडगे प्रेमीनी हा वाढदिवस उत्सव स्वरुपात साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. यासाठी त्यांचे समर्थक नगरसेवक तयारीला लागले आहेत.
भोसरी म्हणजे दादा या समीकरणाकडे वाटचाल
लांडगे यांनी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात व विधीमंडळात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्या निनित्ताने मुख्यमंत्री यांच्या बरोबरच अनेक मंत्र्यांना त्यांनी आपलेसे केले आहे. यामुळे भोसरीमतदारसंघाचे नाव घेतले की महेश दादाचे नाव अपसुकच मंत्र्याकडुन घेतले जाते व दादांचे नाव घेतले की भोसरी मतदारसंघाचे नाव ओघाने निघतेच असे समीकरण तयार झाल्याचा उल्लेख देखील मुख्यमंत्र्यांनी अनेकदा केला आहे.