पिंपरी-चिंचवड : हिंदुत्वावर होणारे आघात, संस्कृतीहननाच्या घटना, देशद्रोह्यांचा उद्दामपणा, पुरोगामित्वाच्या आडून हिंदू धर्माला केले जाणारे लक्ष्य, हिंदूंचे होणारे दमन, धर्मशिक्षणाचा अभाव यामुळे हिंदू समाजाचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे हिंदूसंघटन, धर्मजागृती व हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याच्या उद्देशाने भोसरी येथे हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अॅड. देवदास शिंदे, सनातन संस्थेचे प्रवीण नाईक, हभप शाम महाराज राठोड आदी उपस्थित होते.
इंद्रायणीनगरात सायंकाळी सभा
भोसरी इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या मैदानावर ही धर्मजागृती सभा रविवार (दि. 26) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. सभेच्या प्रचारासाठी शुक्रवार (दि. 24) रोजी दुपारी चार वाजता वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही वाहनफेरी श्री स्वामी समर्थ शाळेतून सुरु होणार आहे. भाजी मंडई, गव्हाणे वस्ती, पुणे-नाशिक रस्ता, भोसरी-आळंदी रस्ता, पीसीएमटी चौक या मार्गावरून ही वाहनफेरी काढण्यात येणार आहे. हिंदू जनजागृती समितीने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक धर्मजागृती सभांचे यशस्वी आयोजन केले असून या धर्मसभेला भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह, हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सनातन संस्थेच्या स्वाती खाडये आदी संबोधित करणार आहेत.
विविध ठिकाणी बैठकांत घेतली मते
गोखले म्हणाले की, हिंदू धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ पिंपरी, चिंचवड, आळंदी, देहू, भोसरी या परिसरात नागरिकांसोबत बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. तसेच विविध माध्यमांमधून नागरिकांचे संघटन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलीकडच्या काळात लव्ह जिहाद, धर्मांतरण, मंदिरांचे सरकारीकरण, बांग्लादेशी घुसखोर, अवैधरित्या भारतात घुसणारे रोहिंगे, वेद-उपनिषदांवर होत असलेला आघात हे प्रश्न प्रामुख्याने भेडसावत आहेत.
‘दशक्रिया’तून चिखलफेक
’पद्मावती’ या चित्रपटात राणी पद्मिनीची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ’दशक्रिया’ या मराठी चित्रपटात अंत्यसंस्कार विधीवर चिखलफेक करण्यात आली आहे. पाश्चात्य संस्कृतीचा सनबर्न फेस्टीवल पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि मोशीसारख्या धार्मिक ठिकाणी भरविला जात आहे. या गोष्टी धर्मासाठी भयंकर घातक आहेत. असे सनातन संस्थेचे प्रवीण नाईक यांनी सांगितले.