पिंपरी-चिंचवड : आमदार महेश लांडगे आणि मित्र परिवाराच्या वतीने 12 ते 14 जानेवारी दरम्यान ’संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय सोहळ्यात प्रल्हाद वामनराव पै ’सुखी जीवनाचे गुपित’ उलघडणार आहेत. प्रल्हाद पै यांना शनिवारी (दि.13) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी पत्रकार परिषेदत दिली.
गावजत्रा मैदानावर सायंकळी व्याख्याने
भोसरीतील, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानात 12 ते 14 जानेवारी 2018 दरम्यान ’संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे या सोहळ्याचे 51 वे वर्ष आहे. शुक्रवार ते रविवार दररोज सायंकाळी साडेसात वाजता प्रल्हाद वामनराव पै प्रबोधन करणार आहेत. तसेच दररोज सायंकाळी पाच ते सहा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्नर माऊलींचा हरिपाठ व संगीत जीवनविद्या होणार आहे. शुक्रवारी(दि.12) सायंकाळी सहा ते साडेसहा या वेळेत सद्गुरु श्री वामनराव पै यांचे शिष्य अशोक नाईक आणि साडेसहा ते सात या वेळेत अंकुश परहर यांची प्रवचने होणार आहेत.
कार्यक्रमाची जय्यत तयारी
लांडगे म्हणाले, आपला समाज भरकटत चालला आहे. समाजाला सद्गुरुंच्या विचारांची खर्या अर्थाने गरज आहे. भोसरी मतदार संघातील नागरिकांपर्यंत सद्गुरुंचे विचार पोहचावेत, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नागरिकांच्या मना-मनामध्ये सद्गुरुंचे विचार पोहोचविणे गरजेचे आहे. प्रल्हाद पै यांचे प्रबोधन ऐकल्यावर जनतेमध्ये बदल होईल, अशी मला खात्री आहे. कार्यक्रमाची मोठी तयारी झाली आहे. दोन लाख पत्रिका छापल्या आहेत. सद्गुरूंच्या हे ईश्वरा प्रार्थनेची दीड लाख पुस्तिका छापली आहेत. सद्गुरूंचे 28 ग्रंथ तिथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या मैदानावर 20 हजार नागरिक बसण्याची क्षमता आहे. वयोवृद्ध नागरिकांसाठी बसण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. पाणी, वाहनतळाची सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, असे शैलेश जोशी यांनी सांगितले.