भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी खडसेंना क्लिनचीट

0

पदाचा गैरवापर झाला नाही; पुणे एसीबीने न्यायालयाने सादर केला अहवाल

भुसावळ । प्रतिनिधी । भोसरी येथील औद्योगिक वसाहतील्या जमीन खरेदी प्रकरणी राज्य शासनाला कोणतेही नुकसान न झाल्याचा अहवाल एसीबीने देत या प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना क्लिनचीट दिली आहे. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसीबीने सादर केलेल्या अहवालानंतर खडसे समर्थकांमध्ये आनंदाची लहर पसरली असून मुक्ताईनगरासह भुसावळात कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी एकच जल्लोष केला.

काय आहे भोसरी प्रकरण ?
पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील जमीन कुटुंबीयांच्या नावे करण्यावरून एकनाथराव खडसे यांची आयोग नेमून चौकशी करण्यात आली. हे प्रकरण समोर आल्यानं नैतिकतेच्या मुद्यावर खडसे यांचा राजीनामाही घेण्यात आला. चौकशी आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू असल्यानं अहवाल निरर्थक ठरल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ केली मात्र आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं खडसेंना क्लीन चिट दिलीय त्यामुळे आता खडसेंना मंत्रिमंडळात घेतलं जाणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मंत्री पदापासून पाय उतार असलेल्या व सरकारवर नाराज असलेल्या खडसे यांनी सार्वजनिक कार्यक्रमातून सरकारवर चांगलीच टीकादेखील केली होती.

पदाच्या गैरवापराचा आरोप ठरला निरर्थक

भोसरी एमआयडीसीतील जमीन कुटुंबीयांच्या नावे करताना खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. याशिवाय त्यांच्या या निर्णयामुळे शासनाचं आर्थिक नुकसान झाल्याचाही आरोप करण्यात आला होता मात्र हे आरोप सिद्घ होत नसल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अहवालात म्हटलंय. हा अहवाल कोर्टात सादर करण्यात आलाय. त्यामुळे अज्ञातवासात गेलेल्या खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे. खडसे यांच्यावर आरोप करणारे आता तोंडघशी पडले असून खडसे त्यांच्याविरुद्ध आता काय भूमिका घेतात ? हेदेखील पाहणे आता आत्सुक्याचे ठरणार आहे.

भुसावळसह मुक्ताईनगरात जल्लोष

खडसे यांनी आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे अनेकदा जाहीर कार्यक्रमात ठासून सांगितले होते शिवाय दोषी असेल तर कारवाई करा मात्र कुठे चुकलो ते आधी सांगा? असे भावनिक आवाहनही केले होते. खडसे यांना आता भोसरी प्रकरणात क्लीन चीट मिळाल्याने त्यांच्या दाव्यात तथ्य दिसून आल्याने आरोप करणारे मात्र तोंडघशी पडले आहेत. खडसेंच्या समर्थकांमध्ये आनंदाची लहर पसरली असून भुसावळासह मुक्ताईनगरात कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी मंगळवारी एसीबीच्या अहवालानंतर एकच जल्लोष केला.

कायद्याच्या चौकटीतच राहून काम केले -नाथाभाऊ

गेल्या दोन वर्षांपासून आपल्यासह कुटुंबावर निरर्थक आरोप करण्यात आले. एकाही आरोपात तथ्य आढळलेले नाही. भोसरी जमीन व्यवहार नियमानुसारच केला होता. माझ्या आयुष्यात आपण एकही नियमाबाह्य काम केलेले नाही व करणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून काम केले आहे. आपल्याला विश्वास होता, चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही. या बाबत आपण वारंवार जाहीर कार्यक्रमातूनही सांगत होतो, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.