भोसरी ते मोशी दरम्यान महामार्गाचे रुंदीकरण

0

पिंपरी-चिंचवड : पुणे-नाशिक महामार्गावर भोसरीतील रोशल गार्डनपासून स्पाईन चौकापर्यंत आणि स्पाईन चौकापासून इंद्रायणी नदीपर्यंत 60 आणि 61 मीटर रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन करण्यात येणार असून, बादित मालमत्ताधारकांना मोबदला देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित मालमत्ताधारकांनी 14 ते 17 जुलै या कालावधीत मोशी करसंकलन कार्यालयात मालकी हक्काच्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

प्रचलित नियमानुसार मोबदला
पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशीतील इंद्रायणी नदी दरम्यानचा भाग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 मध्ये आहे. या रस्त्याअंतर्गत भोसरीतील रोशल गार्डनपासून स्पाईन चौकापर्यंत सुमारे 2 हजार 200 मीटर रस्ता 61 मीटर रुंदीकरणासाठी आणि स्पाईन चौकापासून इंद्रायणी नदीपर्यंत सुमारे 4 हजार 400 मीटर रस्ता 60 मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणाकरिता आवश्यक असलेल्या जागेचा संबंधित मालमत्ताधारकांनी आगाऊ ताबा दिल्यास त्यांना या जागेचा एफएसआय, टीडीआर, डीआर किंवा खासगी वाटाघाटीने महापालिकेच्या प्रचलित नियमाप्रमाणे देय असलेला मोबदला दिला जाणार आहे.

तीन दिवसांची मुदत
त्यासाठी संबंधित मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या नावाने प्रतिकात्मक ताबा पावती महापालिका नियमाप्रमाणे करून देण्याची गरज आहे. याबाबत संबंधित मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या मोशी करसंकलन कार्यालयात 14, 15 आणि 17 जुलै या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या मालकी हक्काच्या कागदपत्रांसह तसेच आपल्या व कुटुंबीयांच्या ओळखपत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.