भोसरी नाका परिसरात ‘अटल आहार योजने’ चा शुभारंभ

0

कामगार नेते इरफान सय्यद यांच्या प्रयत्नाने उपक्रमाची सुरुवात

योजनेद्वारे सकस आहार मिळणार तो…ही…केवळ पाच रूपयात

पिंपरी :  शिवसेना व कामगार नेते इरफान सय्यद यांच्या प्रयत्नातून भोसरी मतदारसंघातील भोसरी नाका परिसरात महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कल्याणकारी योजना क्रमांक २८ अंतर्गत, नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी ‘अटल आहार योजना’ या संकल्पनेतून ५ रूपयात ‘मध्यान्ह भोजन’ या योजनेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी भोसरी विधानसभेतील बांधकाम मजूर, माथाडी कामगार व महिला भगिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिला-भगिनींनी आनंदाच्या भरात इरफान सय्यद यांना प्रेमाचा घास भरविला.

कामगारांना ४.५ लाख रुपयांचे अनुदान

इरफान सय्यद म्हणाले की,  इमारत व इतर बांधकाम कामगार (नोकरीचे नियमन व सेवाशर्थी) अधिनियम १९९६ च्या भारत सरकारच्या निर्णयाने हा कायदा पारित झाला. तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात (दि. १. मे. २०११) रोजी हे कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्यात उभारीस आले. ही योजना सर्वप्रथम उत्तर तथा दक्षिण दिल्ली येथे राबविण्यात आली. परंतू, त्या ठिकाणी मध्यान्ह भोजनासाठी दहा रुपये शुल्क आकारण्यात येत होते. युती सरकारने कामगारांसाठी केवळ पाच रूपयात ही योजना आमलात आणली. याशिवाय युती सरकारने घर उभारणीसाठी याआधीही श्रमिक योजने अंर्तगत कामगारांना ४.५ लाख रुपयांचे अनुदानही सुरु केले आहे.

कामगारांच्या आयुष्यात परिवर्तन होणार…

काबाडकष्ट करणारा आपला नाका बांधकाम कामगार जेव्हा आपल्या पत्नीसह बांधकाम साईटवर जाण्यास बाहेर पडतो. तेव्हा त्या दिवशी त्याला काम मिळेलच आणि मिळालेल्या कामाचा त्याच दिवशी मोबदला मिळेल, याबाबत साशंकताच असते. अशा वेळी एक वेळचे जेवणही त्याच्यासाठी खूप मोठी पर्वणीच असते. या योजनेमुळे बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी तोही सकस आहार केवळ नाममात्र पाच रूपयात देण्यात येईल. ‘अटल आहार योजने’ च्या माध्यमातून कामगारांच्या आयुष्यात नक्कीच परिवर्तन होईल, असा आशावाद इरफान सय्यद यांनी यावेळी व्यक्त केला.