भोसरी परिसरात समान पाणीपुरवठा करा

0

पिंपरी-चिंचवड। राजकीय दबावाला बळी पडून पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत करू नका. भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्व भागात समान पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी केल्या आहेत. भोसरी परिसर आणि समाविष्ठ गावात सध्या पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक-पदाधिकार्‍यांची बैठक आळंदी येथील गेस्ट हाऊसवर घेण्यात आली. यावेळी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत बरशेट्टी यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

उपनगरांमध्ये समस्या
उपनगरांमध्ये सध्या पाणी समस्या जाणवू लागली आहे. उन्हाळा सुरु झाल्यामुळे अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच, काही ठिकाणी राजकीय दबावाला बळी पडून संबंधित अधिकारी ठराविक सोसायट्यांना मुबलक पाणीपुरवठा करून घेत आहेत. परिणामी, अन्य भागात पाणी कमी मिळत आहे. त्यामुळे चर्‍होली, मोशी, दिघी आदी परिसरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकार्‍यांनी बैठक घेतली.

तक्रारींचा निपटारा करू
याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत बरशेट्टी म्हणाले की, दिघी येथील पाणी टाकीसह भोसरी एमआयडीतील पाणीपुरवठा सक्षम करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार लांडगे यांनी आढावा बैठक घेतली होती. परिसरातील पाणीपुरवठा सक्षम करण्याबाबत आम्ही ठोस कार्यवाही करणार असून, व्हॉल्व्हमन बाबतच्या तक्रारींचाही निपटारा करण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे याबाबत बोलताना म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ठ गावांसह अन्य भागात काही ठिकाणी पाणीपुरवठ्याबाबत राजकीय हस्तक्षेप होत होता. परिणामी, पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. महापालिकेतील काही अधिकारी आणि राजकीय व्यक्तींची मिलीभगत असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय सर्व भागात समान पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.