Investigation in Bhosari case is a part of investigation agencies : Gulabrao Patil जळगाव : भोसरी प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याचे हे प्रकरण आम्ही नाही, तर तपास यंत्रणांनी काढलेले आहे. ही चौकशी म्हणजे तपास यंत्रणांचा तपासाचा भाग आहे. एकनाथ खडसे (Eknathrav Khadse) यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे आणि जर ते यात निर्दोष असतील तर त्यांना घाबरण्याची गरज नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. दरम्यान, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची पुन्हा चौकशी होणार असल्याने खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यात सरकारकडून छळ केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Mantri Gulabrao Patil) यांनी उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
आमदार फुटीच्या बातमीवर ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सामना हे वर्तमानपत्र कोणाचे आहे हे सर्वांना माहित आहे. आपले राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच त्याचे हे वक्तव्य असेल असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना लगावला आहे. शिंदे गटातील काही नाराज आमदार फुटून ते भारतीय जनता पक्षात जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात देण्यात आली होती. त्यावर बोलताना मंत्री पाटील (Mantri Gulabrao Patil) यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.