भोसरी विधानसभा निवडणुकीआधीच फिक्सिंग!

0

आमदार जगतापांकडून गुणगान

लांडे-जगताप यांचे गळ्यात गळे, लांडगे देखील झाले सावध?

पिंपरी-चिंचवड (बापु जगदाळे) : मान्सूनच्या वादळी पावसाबरोबरच भोसरी विधानसभा मतदार संघात आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वारेही जोरात घोंघावू लागले आहे. चिंचवडचे भाजपा पुरस्कृत आमदार लक्ष्मण जगताप यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना कायम साथ देणार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच आमदारपदाचे फिक्सिंग झाल्याचे बोलले जात आहे. तर जय-विरूची ही जोडी एकत्र आल्यामुळे भाजपाचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांची आगामी निवडणुकीत दमछाक होणार का, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या दिमाखात साजरा झाला. संपूर्ण शहरात शुभेच्छांचे होर्डिंग लावण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार जगताप यांची हजेरी
लांडे यांच्या वाढदिवसाला विरोधी पक्षाचे आमदार व भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी ही हजेरी लावल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. खरंतर विलास लांडे आणि लक्ष्मण जगताप यांची मैत्री संपूर्ण शहराला सर्वश्रुत आहे. तरीही राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून बोलताना ज्याप्रकारे लक्ष्मण जगताप यांनी विलास लांडे यांचे गुणगान गायले आणि विलासराव हे माझे राजकीय गुरू असल्याचे सूतोवाच केले त्यामुळे सर्वांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.

पक्षनेत्यांवर ठेवली निष्ठा
यावेळी माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, राजकारणात जास्त काळ कधी कुणाचा शत्रू नसतो. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपात गेलो असतो, तर खर्च न करता आमदार झालो असतो. परंतु, पक्षासह नेत्यांवर निष्ठा ठेवत इथंच राहिलो. या शिवाय लक्ष्मण जगतापांशी मैत्रीच्या पलीकडचे तीन पिढ्यांचे नाते आहे. ते यापुढेही कायम राहणार आहे. तर विलासराव हे माझ्यासाठी गुरुस्थानी असून त्यांना कायम साथ देणार आहे, असे सूचक वक्तव्य आमदार जगताप यांनी केले आहे.

जोरदार ब्रँडिंग आणि शक्तिप्रदर्शन
विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात शुभेच्छांची होर्डिर्ंग्ज उभारण्यात आली होती. तसेच शुभेच्छा समारंभाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय विरोधी पक्षाचे आमदार आणि विलास लांडे यांचे जवळचे मित्र लक्ष्मण जगताप यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. वाढदिवसाचे औचित्य साधून विलास लांडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जोरदार बॅ्रंडिंग आणि शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

…तर आमदार लांडगेंना धोबीपछाड!
आमदार जगताप आणि माजी आमदार लांडे यांनी एकत्र येऊन निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकले तर आमदार लांडगे यांना धोबीपछाड मिळू शकतो. अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण आमदार लांडगे हे भाजपाचे सहयोगी आमदार आहेत तर लक्ष्मण जगताप हे भाजपा पक्षाचे आमदार आहेत. या दोघांमध्ये असणारे मतभेद उघड आहेत. त्यामुळे भविष्यात लांडे-जगताप मैत्रीचे रुपांतर युतीत झाले तर आमदार लांडगे यांची राजकीय कोंडी होऊ शकते.

आमदार जगताप नाराज?
महापालिकेतील पद वाटप, विकासकामे, तसेच मानापमानाच्या मुद्यांवरून आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांच्यात खटके उडत आहेत असे बोलले जाते. तसेच एकमेकांच्या मतदार संघात लक्ष घालायचे नाही, असा अलिखित करार असतानाही आमदार लांडगे यांनी चिंचवडमधील प्रतिस्पर्धी राहुल कलाटे यांच्या विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार जगताप यांना जाणीवपूर्वक अंधारात ठेवले. असा आरोप जगताप गटाचा आहे. तसेच अद्यापही आमदार लांडगे यांनी अदयापही भाजपा मध्ये प्रवेश केलाला नाही. ते भाजपाचे सहयोगी सदस्य म्हणूनच भाजपाला मदत करतात. यामाघे त्यांचे कोणते राजकीय डावपेच आहेत. हे आत्ता तरी सांगता येत नाहीत. पण विलास लांडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आमदार जगताप यांना आमंत्रित करुन जो काही राजीकय चाणक्ष पणा दाखवला आहे. हा चाणक्षपणा येणा-या निवडणुकीत काय ताकद देईल या बाबत स्पष्टपणे संकेत मिळतच आहेत. आता येत्या निवडणुकांमध्ये आमदार जगताप यांच्या या नाराजीचा फायदा नेमका कुणाला होणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आमदार लांडगेदेखील झाले सावध
मोदी लाटेत देखील अपक्ष निवडणुक लढवून भोसरीचे आमदार झालेले महेश लांडगे देखील आता राजकारणाच्या आखाड्यात भलतेच तयार झाले आहेत. त्यामुळेच राज्यात मुख्यंमत्र्यांच्या अतिशय निकटवर्तीय असलेल्या सात आमदारांमध्ये त्यांच्या समावेश होत आहे. तसेच मतदारसंघातील त्यांचा दांडगा संपर्क, तरुणांचा पाठीमागे असलेला प्रचंड फौडफाटा, मतदारसंघातील अनेक समस्यांना दिलेला न्याय व त्यांचे बंधू मिनी आमदार कार्तिक लांडगे यांचे पडद्यामागील डावपेच अशा अनेक जेमेच्या बाजू आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या एका गटाचा देखील लांडगे यांना मागील वेळे सारखाच पाठींबा आहे. त्यामुळे सर्वानाच लांडगे पुरुन उरतील अशा व्होरा आमदार लांडगे गटाचा आहे. त्यामुळे शहरात इतर मतदारसंघा पेक्षा भोसरी विधानसभेची लढत नक्कीच रंगतदार व चुरशीची होणार यात शंका नाही.